मुलुंड- गोरेगाव लिंक रोड येथे जलवाहिनी वळविण्याचे आणि माहीम येथे जलबोगदा जोडण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आह़े  त्यामुळे मंगळवार, ५ मार्च रोजी दादर, माहीम आणि प्रभादेवी परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर मुंबईतील अन्य काही भागात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आह़े
मुलुंड- गोरेगाव लिंक रोड, मुलुंड येथे १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम आणि माहीम, प्रभादेवी परिसरात जलबोगदा जोडणीचे काम ४ मार्च रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम ६ मार्च रोजी रात्री पूर्ण होईल, असे जल विभागातील सूत्रांनी सांगितले. या कामामुळे दादर, प्रभादेवी, माहीम या भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कुलाब्यापासून ताडदेवपर्यंतच्या परिसरात तसेच वांद्रे ते दहिसर भागात २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.