सिग्नलवर गाडय़ा थांबण्याची मर्यादारेषाच नसल्याने कारवाईत अडचणी

मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना त्याचा उपयोग वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठीही करण्याचा मुंबई पोलिसांचा उपक्रम प्रशासकीय अनास्थेमुळे अपयशी ठरू लागला आहे. सिग्नलवरील दिवा लाल असताना वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या ‘थांबारेषे’च्या (स्टॉप लाइन) आत वाहने थांबवावीत, असा नियम आहे. परंतु मुंबईतील बहुतेक रस्त्यांवर अशा ‘थांबारेषा’च नसल्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कशी करायची, असा प्रश्न पोलिसांना पडत आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोठा गाजावाजा करत प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र उपनगरातील अनेक सिग्नलवर स्टॉप लाइनच नसल्याने बेशिस्त वाहनचालकाच्या थेट मोबाइलवर ई-चलान पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पोलिसांच्या मोहिमेलाच त्यामुळे ‘फुलस्टॉप’ लागला आहे. पालिकेचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत असून दोन महिने झाले तरी या कारवाईला म्हणावा तसा वेग आला नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

वाहतुकीच्या नियमाप्रमाणे रस्त्यावरील प्रत्येक सिग्नलवर ‘स्टॉप लाइन’ आणि झेब्रा क्रॉसिंग अत्यंत गरजेची असते. मात्र मुंबई व उपनगरातील अनेक सिग्नलची ठिकाणे अशी आहेत, ज्यावर स्टॉप लाइनच नाहीत. तर काही ठिकाणावरील या रेषा दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे सिग्नलवरील नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे कठीण झाले आहे. सिग्नलमधील बिघाड तसेच रस्त्यावरील स्टॉप लाइन आणि झेब्रा क्रॉसिंगच्या देखभालीचे काम हे महानगरपालिकेच्या अंतर्गत येते. मात्र त्याची व्यवस्थित देखभालच होताना दिसत नाही.

मुंबई व उपनगरात एकूण ७५० सिग्नल आहेत, त्यापैकी अनेक ठिकाणी स्टॉप लाइन व झेब्रा क्रॉसिंग गायब झालेली आहेत. वाहनांच्या चाके आणि प्रदूषणामुळे त्या स्टॉप लाइन पुसल्या जातात. पालिकेने या कामात सुरुवात केली असून येत्या दोन वर्षांत आणखी दोन हजार सिग्नल मुंबईत नव्याने उभे करणार असल्याचे वाहतूक व रहदारीचे सल्लागार डॉ. शंकर विश्वनाथ यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनी आम्हाला शहरातील ४७ टक्के ठिकाणांच्या दुरुस्तीचे काम दिले होते. त्यातील ३७ टक्के सिग्नलच्या स्टॉप लाइनचे काम आमच्याकडून पूर्ण झाले असून अवघ्या १० टक्के सिग्नलच्या दुरुस्तीचे काम बाकी आहे. तसेच येत्या आठवडय़ाभरात हे कामदेखील आम्ही पूर्णत्वाला येणार आहे ज्या ठिकाणी स्टॉप लाइन नाहीत, त्या ठिकाणी कारवाई करणे कठीण जात आहे. त्यामुळे पालिकेने काही सिग्नलवर तात्पुरती रेषा आखून दिल्याने सध्या कारवाई होत आहे. पालिकेने ठिकठिकाणी  काम सुरू असून दोन आठवडय़ांत हे काम पूर्ण करण्याचे पालिकेने आश्वासन दिले आहे.