राजकारण आणि समाजकरणात कोणीही कायमचे अस्पृश्य नसते, असे विधान भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संस्थेच्या व्यासपीठावर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यास सारे पर्याय खुले असल्याचा अप्रत्यक्ष इशाराच काँग्रेसला दिला आहे.
 पक्षासाठी सारे पर्याय खुले आहेत, असे पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हाच जाहीर केले होते. मात्र १९९९ पासून पवार यांनी काँग्रेसची साथ कायम ठेवली. १९९९च्या विधानसभा निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाने पवार यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केल्यावरही पवार यांनी काँग्रेसबरोबर जाणे पसंत केले. काँग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी यांच्या कलाने होऊ लागले आहेत. पवार आणि राहुल या दोन्ही नेत्यांच्या मनात परस्परांबद्दल असलेली अढी लपून राहिलेली नाही.
विविध घोटाळे आणि गैरव्यवहारांमुळे काँग्रेसबद्दल देशात नाराजीची भावना आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी फारसे वातावरण चांगले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाल्यास पवार वेगळा विचार करू शकतात. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेईल हे आता सांगणे कठीण असले तरी काँग्रेसबरोबर राहणार नाहीत, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांना वाटते.  
राज्यात जागावाटप मनाप्रमाणे व्हावे ही राष्ट्रवादीची अपेक्षा असली तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ताणून धरले आहे. काँग्रेसवर दबाव वाढविण्याच्या उद्देशानेच पवार यांनी राजकारणात कोणी कोणाचा कायमचा अस्पृश्य नसतो हा उल्लेख केला असावा, असा काँग्रेस नेत्यांचा आंदाज आहे. पवार यांनी हा उल्लेख यापूर्वीही दोन-तीनदा केल्याकडे लक्ष वेधण्यात येते. काँग्रेसबरोबर कायम घरोबा राहिलच असे नाही हा संदेश त्यांनी या विधानातून दिला असल्याचे मानले जात आहे.