घर भाडय़ाने देताना घरमालक आणि भाडेकरू यांची पोलिसांच्या त्रासापासून सुटका झाली आहे. घरमालकाला पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक नसून केवळ भाडेकरूची माहिती कळवयाची आहे. पोलिसांनीच एका पत्रकाद्वारे हे स्पष्ट केले आहे. यामुळे ‘ना हरकत प्रमाणपत्राच्या’ नावाखाली चालणाऱ्या पोलिसांच्या खाबूगिरीला लगाम बसणार आहे.
 सुरक्षेच्या कारणास्तव घर भाडय़ाने देण्यापूर्वी भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे मुंबई पोलिसांनी कलम १४४ अन्वये बंधनकारक करण्यात आले होते. परंतु त्याचा गैरवापर खुद्द पोलिसांकडून करण्यात येत होता. घरमालकाला पोलीस ठाण्यातून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगितले जायचे. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खाजगी दलाल कार्यरत झाले होते. तसेच पोलीस ठाण्यातून पैशांची मागणी केली जायची. अवास्तव कागदपत्रेही मागितले जायचे. जे घरमालक ना हरकत प्रमाणपत्र घेत नव्हते त्यांच्यावर अटक करून कायदेशीर कारवाई केली जायची. यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. हे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी घरमालक आणि भाडेकरूंना पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागायचा आणि त्यांचा वेळ जायचा. परंतु घर भाडय़ाने देताना अशा ना हरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार घर भाडय़ाने देण्यापूर्वी भाडेकरू ची माहिती केवळ पोलीस ठाण्यात कळवायची आहे. ही माहिती प्रत्यक्ष देण्याव्यतिरिक्त पोस्टाने आणि कुरियरनेसुद्धा करता येणार आहे. आम्हाला फक्त भाडेकरूंची माहिती हवी होती परंतु त्याचा गैरवापर केला जायचा. त्यामुळे हे परिपत्रक सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून जनतेला आवाहन केले जात आहे, असे पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.