मुंबई : गणेश विसर्जनामध्ये रात्री १२ नंतर अनेक ठिकाणी मिरवणुकांतील वाद्यांचा आवाज थांबला तरी त्यापूर्वी अनेक ठिकाणी आवाजाची पातळी विहीत मर्यादेपेक्षा दुप्पटच आढळून आली. आवाज फाऊंडेशनने गुरुवारी शहरातील महत्त्वाच्या विसर्जन मार्गावरील केलेल्या पाहणीमध्ये रात्री ८ ते १२ या वेळेत ऑपेरा हाऊस येथे १२१.३ डेसिबल अशी आवाजाची सर्वाधिक नोंद करण्यात आली.

ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियमावली) २००० नुसार रहिवासी क्षेत्रात आवाजाची कमाल पातळी ही ५५ डेसिबल इतकी ठरवण्यात आली आहे. मात्र विसर्जनाच्या मिरवणुकीत ही पातळी तब्बल १२१.३ डेसिबल इतकी वाढली होती. अनेक ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची नोंद झाली. त्यामध्ये बेंजो, ड्रम्स, नाशिक ढोल, बेंजो अशा वाद्यांचा समावेश होता.

‘ध्वनी प्रदूषणाबाबत बऱ्यापैकी जागरूकता आली आहे, अनेक मंडळांनी रात्री बाराला मिरवणुकीतील वाद्यांचे आवाज बंद केले. मात्र त्यापूर्वी आवाजाची पातळी खूप मोठी होती. ‘मेटल सिलेंडर’ या वाद्याचा आवाज सर्वाधिक नोंदवण्यात आला’, असे आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. डीजेवर बंदी असली तरी ऑपेरा हाऊस परिसरात त्यांना एका मिरवणुकीत डीजेचा वापर आढळून आला. आवाज फाऊंडेशन त्यांच्या नोंदी पोलिसांना पत्राद्वारे पाठवणार आहेत.