ध्वनी प्रदूषणामुळे निद्रानाश, चिडचिड, कार्यक्षमतेवर दुष्परिणाम

रेल्वे स्थानकांतील उद्घोषणा आणि गाडय़ांचे हॉर्न यामुळे स्थानके आणि रेल्वे मार्गालगत राहणाऱ्यांच्या आरोग्यावर निद्रानाश, चिडचिड, कार्यक्षमता कमी होणे आदी दुष्परिणाम झाल्याचे पाहणीतून निदर्शनास आले आहे. स्थानक परिसराचा अभ्यास केला असता तेथील रहिवाशांमध्ये या समस्या तीव्र असल्याचे आढळले आहे.

वांद्रे येथील थाडोमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भांडुपच्या एस. एस. दिघे कॉलेज ऑफ सायन्सच्या महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी केलेल्या पाहणीत रेल्वे स्थानकालगत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील २० विद्यार्थ्यांचा अभ्यास केलात. त्यात रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या १० आणि स्थानकापासून दूर राहणाऱ्या १०विद्यार्थ्यांचा सहा महिने तुलनात्मक अभ्यास केला. ‘जर्नल ऑफ इर्मजिंग टेक्नॉलॉजीज अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च’मध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. भांडुप स्थानकालगतच्या आणि इतर परिसरांतील ध्वनीच्या पातळीचे मोजमाप करण्यात आले. त्यात ६० डेसिबल ते १३० डेसिबल आवाज निर्माण होत असल्याचे नोंदविले गेले. स्थानकात ट्रेन आल्यावर ८८ डेसिबलपर्यंत आणि ट्रेनने हॉर्न वाजविल्यानंतर १०७ डेसिबलपर्यंत आवाज नोंदवला गेला.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांच्या नोंदीमध्ये रेल्वे स्थानकालगत राहणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांना झोप कमी मिळणे, ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव आणि १०० टक्के विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड या समस्या आढळल्या. स्थानकापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हा त्रास तुलनेने कमी आढळला. १५ टक्के विद्यार्थ्यांना झोपेच्या तक्रारी, १५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण आणि पाच टक्के विद्यार्थ्यांची चिडचिड होत असल्याचे आढळले. रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्यांची रात्री रेल्वेच्या आवाजामुळे अनेक वेळा झोपमोड होत असल्याने जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनी दिवसाही झोप येत असल्याची तक्रार केली. रेल्वे स्थानकापासून दूर राहणाऱ्या २५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये ही तक्रार आढळली.रेल्वे स्थानकांलगत राहणाऱ्या व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी स्थानकांच्या बाजूने ध्वनिरोधक कुंपणे लावणे, घर्षणामुळे होणारा आवाज कमी करण्यासाठी रेल्वेच्या रुळांचे योग्य व्यवस्थापन करणे आदी पर्याय अवलंबिण्याचे या अभ्यासातून सूचित केले आहे.

ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम

शहरातील वाहनांची वाढती गर्दी, बांधकामांचे आवाज याचा त्रास रहिवाशांना होत नाही, कारण त्यांच्या कानांना आवाज सहन करण्याची सवय लागली आहे. हे धोकादायक आहे. ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले आणि तरुणांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, मानसिक ताण, नैराश्य आणि ऐकण्याची क्षमता कमी होणे, असे दुष्परिणाम होतात, अशी माहिती ध्वनी प्रदूषणावर र्निबध घातले जावेत, यासाठी कार्यरत असलेले डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.