यंदाची दिवाळी कमी आवाजाची होती या सर्वसामान्यांच्या निरीक्षणावर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ध्वनिमापन चाचण्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. शहर व उपनगरातील ४५ ठिकाणी केल्या गेलेल्या पाहणीनुसार अनेक परिसरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी फटाक्यांच्या धुरामुळे होणारे हवाप्रदूषणही यावेळी मर्यादित राहिले.
गेल्या काही वर्षांत फटाक्यांमुळे होत असलेले ध्वनिप्रदूषण व हवाप्रदूषण याबाबत होत असलेल्या जनजागृतीचा प्रभाव यावेळच्या दिवाळीला दिसून आला. दिवाळीच्या पहाटे तसेच नरकचतुर्दशीच्या संध्याकाळी फटाक्यांचा आवाज खूपच कमी होता. मात्र लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी शहराच्या विविध भागात फटाक्यांच्या माळा व अ‍ॅटमबॉम्बनी कानठळ्या बसवल्या. अर्थात गेल्या काही वर्षांपेक्षा त्यांचा आवाज कमी असल्याचे पाहणीत दिसले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुलाबा, मंत्रालय परिसर, प्रभादेवी, सायन, दादर हिंदु कॉलनी, वर्सोवा, धारावी, मालाड, बोरीवली तसेच मुलुंड पश्चिम भागात गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक आवाजाची नोंद झाली. यातील बहुतांश ठिकाणी आवाजाची सरासरी पातळी ८० डेसिबलहून अधिक झाली होती. इतर ठिकाणी मात्र फटाक्यांचा आवाज कमी झालेला दिसला. लक्ष्मीपूजनादिवशी सरासरी पातळी ६० ते ८० डेसिबलपर्यंत राहिली. या पातळीत गेल्या वर्षांच्या तुलनेत फारशी घट झालेली नसली तरी वाढही झालेली नाही. ध्वनीप्रदूषणाच्या नियमानुसार रहिवासी भागात सकाळी ५५ डेसिबल तर रात्री ५० डेसिबलची मर्यादा घालण्यात आली आहे.
हवा प्रदूषणातही घट
फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील कार्बन मोनॉक्साइड तसेच धूलीकणांचे प्रमाण वाढते. दिवाळीच्या तीन, चार आणि पाच नोव्हेंबर या तारखांना वांद्रे येथील प्रदूषण मापन केंद्रात कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाणे सुमारे दोन मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवण्यात आले. सरासरी हे प्रमाण एक मायोक्रोग्रॅम् असते. मात्र तरीही हे प्रमाण मर्यादेबाहेर वाढले नसल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी धूलीकणांचे प्रमाण मात्र अपेक्षित मर्यादेपेक्षा  (१०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) कितीतरी अधिक राहिले. तीन नोव्हेंबर म्हणजे लक्ष्मीपूजनादिवशी वांद्रे येथे तब्बल १७४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर प्रमाण होते. व्यापारी नववर्षदिन आणि भाऊबीजेलाही प्रतिघनमीटर अनुक्रमे १३६ व १३४ मायक्रोग्रॅम प्रमाण होते.