दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात  शेकडो कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या फटाके व्यवसायाला यंदाच्या दिवाळीत मंदी, वाढलेली महागाई आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचा मोठा फटका बसला आहे. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांना आधीच घसरण लागलेली असताना आता रोषणाईच्या फटाक्यांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात या व्यवसायाला आणखी घरघर लागणार का, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. त्यातही मोठय़ा शहरांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, या दिवाळीत वेगवेगळय़ा कारणांमुळे फटाक्यांचा बार ‘फुसका’ निघाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी त्यांची विक्री तब्बल २५ ते ५० टक्क्यांनी घटली आहे. २०११ च्या तुलनेत तर या वेळी खूपच कमी फटाके विकले गेले. हा कल गेले तीन वर्षे कायम असल्याने ती या व्यवसायासाठी धोक्याची घंटा असल्याची भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. आताच्या वर्षी बहुतांश व्यावसायिकांकडील फटाके मोठय़ा प्रमाणात शिल्लक राहिले असल्याचे निरीक्षण पुणे व मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगितले. हीच स्थिती नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमध्येही होती.
या वेळच्या दिवाळीवर मंदीचे सावट होते. फटाक्यांच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. त्याचबरोबर शाळांमध्ये फटाके न वाजवण्याबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे अनेक शहरांमध्ये मुलेच फटाके वाजवण्याबाबत पालकांना सांगत होती, असे निरीक्षण सर्वच शहरांतील फटाके विक्रेत्यांनी नोंदवले. फटाक्यांची विक्री घटल्यामुळे या वेळी लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता दिवाळीच्या इतर दिवशी फटाक्यांचा धूर निघाला नाही. त्यामुळे काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले.
फटाके कमी वाजण्याची कारणे
*पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे मुलांचा कल
*फटाके न वाजवण्याबाबत शाळांमधून जागरूकता, मुलांनी घेतलेल्या शपथा
*सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा फटका
*विविध कारणांमुळे फटाक्यांच्या किमतीत २५-३० टक्के वाढ
*काही शहरांमध्ये रस्त्यांवर स्टॉलला परवानगी नाकारल्याने स्टॉल्सची संख्या कमी