सर्वसामान्यांच्या हातात भ्रमणध्वनी पोहचवून भ्रमणध्वनी क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या फिनलंडच्या नोकिया कंपनीचा आता अस्त होणार आहे. संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने यापूर्वीच नोकिया कंपनी ताब्यात घेतली होती. आता या कंपनीचा मोबाइल विभागही येत्या शुक्रवारी मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन होणार असून नोकियाची ओळख आता ‘मायक्रोसॉफ्ट मोबाइल’ अशी होणार आहे. विलीनीकरणाचा हा व्यवहार ७.२ अब्ज डॉलर्सचा असणार आहे.
नोकिया भ्रमणध्वनी आणि सेवा व्यवसाय आता मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन झाल्यानंतर कंपनीची नवी उत्पादने यापुढे मायक्रोसॉफ्टच्या नावाने ओळखली जाणार आहे. या विलीनीकरणानंतर मायक्रोसॉफ्टच्या व्यवसायात कोटय़वधी डॉलर्सची उलाढाल होणार असून स्मार्ट फोनच्या बाजारात नव्या नावाचा समावेश होणार आहे. नोकिया कंपनीच्या चेन्नई येथील वादग्रस्त कारखान्याबद्दल कंपनीने कोणतेही वक्तव्य केले नाही. पण हा कारखाना ‘एचटीसी’ कंपनी चालवायला घेण्याच्या विचारात असल्याचे कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी चीया लीन चांग यांनी सोमवारी दिल्ली येथील एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यामुळे या कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे ६५०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. चेन्नई येथील नोकियाच्या कारखान्याबाबत तामिळनाडू राज्य सरकारने कोटय़वधींचा दंड ठोठावला होता. तोपर्यंत हा कारखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
एके काळी मोबाइल बाजारात अधिराज्य गाजविणारी नोकिया कंपनी स्मार्टफोनच्या बाजारात मात्र तग धरू शकली नाही. यामुळे या कंपनीला उतरती कळा लागली. कंपनीने ‘नोकिया आशा’ हे स्मार्ट फोन बाजारात आणत नवी सुरुवात केली. तरीही त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. अखेर कंपनीने मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोनची ‘लुमिया’ सीरिज बाजारात आणली. तरीही यश न आल्यामुळे नोकियाने ‘एक्स’ या मॉडेलमध्ये अँड्रॉइडची सुविधाही उपलब्ध करून दिली. मात्र त्यातही ते फारसे यशस्वी झाले नाही. या विलीनीकरणानंतर ही कपंनी काय नवीन देणार आणि बाजारात किती तग धरणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.