भायखळा येथील एका मोकळ्या भूखंडावर झोपडय़ा दाखवून पुनर्विकासाच्या योजनेला मंजुरी दिल्याप्रकरण पालिकेच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पांडुरंग कोळेकर यांच्यावर निवृत्ती वेतनातून केवळ पाच हजार रुपये दंड वसूल करण्याची शिक्षा सुनावून प्रशासन त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र स्थायी समितीसमोर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर होताच सदस्यांनी निवृत्त सहाय्यक आयुक्ताची ग्रॅच्युटी, भविष्य निवाहनिधी रोखून त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्याची मागणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थायी समिती अध्यक्षांनीही हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठवून दिला.
भायखळायेथील बापूराव जगताप मार्गावरील डीव्हीजन कॅटल पॉन्ड गार्लिक कम्पाऊंडमधील मैदानात एकही निवासी गाळा नव्हता. असे असताना तेथे निवासी गाळे दाखवून पुनर्विकास योजनेला मंजुरी देण्यात आली होती.