News Flash

विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर गंडांतर

पुण्याप्रमाणे मुंबईमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी मिळविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे

| August 12, 2013 04:15 am

पुण्याप्रमाणे मुंबईमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी मिळविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सक्रिय झाली आहेत. मात्र कायद्याचे काटेकोरपणे पालन करून आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने प्रचंड आवाज करणाऱ्या पारंपरिक वाद्यांवरही गंडांतर आले आहे. ‘मुंबईला सापत्न वागणूक देऊ नये’, असे साकडे राज्य सरकारला घालण्याचा निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला आहे.
जुने काय?
रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास न्यायालयाने मज्जाव केल्यानंतर मुंबई-पुण्यातील गणेशोत्सवातील जागरावर बंधने आली. बेन्जो, ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका रात्री १० वाजता आटोपत्या घ्याव्या लागत होत्या. पुण्यातील रात्रभर चालणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असत. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे रात्री १० नंतर मिरवणुका सुन्या होऊ लागल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत किमान पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांकडून होऊ लागली. अखेर गेल्या वर्षी पुण्याच्या पालकमंत्र्यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली आणि पुण्यात मध्यरात्रीपर्यंत ढोल-ताशा घुमला. मात्र मुंबईत तशी सवलत नसल्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या आनंदावर विरजण पडले.
नवे काय?
पुण्याप्रमाणे मुंबईतही यंदा मध्यरात्रीपर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी अलीकडेच पोलीस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत केली. मात्र पोलीस आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाद्यांचा आवाज ४५ ते ५५ डेसिबल इतका असला पाहिजे. मात्र पारंपरिक वाद्यांचा आवाज प्रचंड होत असून त्यामुळे कायद्याचेही उल्लंघन होते. परिणामी कोणत्याही परिस्थितीत रात्री उशिरापर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच साकडे घालण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.
गेल्या वर्षी पुण्यात उशिरापर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली. मात्र त्याबाबतचे शासकीय आदेश अद्यापही जारी करण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारने हे आदेश जारी केल्यास मुंबईतही विसर्जन मिरवणुकांमध्ये उशिरापर्यंत पारंपरिक वाद्ये वाजविता येतील.
अ‍ॅड. नरेश दहिबावकर ,
अध्यक्ष , बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 4:15 am

Web Title: non conventional musical instrument in ganesh cremation rally
Next Stories
1 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये उद्या यशस्वी उद्योजिकेशी संवाद!
2 दक्षिण मध्य मुंबईचा किल्ला ‘सर’ करणे महायुतीला अवघड!
3 वीज आयोगाकडून सौरऊर्जा कंपनी वाऱ्यावर
Just Now!
X