करोना काळात करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार देणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही आता विम्याचे सुरक्षा कवच देण्याच्या स्पष्ट सूचना आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यंना दिल्या आहेत. त्यामुळे आता खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा करोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ५० लाख रुपयांचा आर्थिक मदत मिळणार आहे.

करोना महासाथीमध्ये करोना रुग्णांना सेवा देणाऱ्या खासगी किंवा सरकारी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यास केंद्रीय विमा योजनेअंतर्गत कुटुंबीयांना ५० लाख रुपये  मिळण्याची तरतूद आहे. परंतु यात करोनाव्यतिरिक्त इतर सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे करोना साथीतही जीवाची पर्वा न करता अन्य आजारांच्या सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांनी विमा सुरक्षा कवच नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.

याची दखल घेत आरोग्य विभागाने सेवा देणाऱ्या सर्व खासगी डॉक्टरांना ही विमा योजना लागू असल्याचे परिपत्रकाद्वारे सर्व जिल्ह्यंना सूचित केले आहे.

राज्यभरात करोना काळात सेवा देणाऱ्या आयएमएच्या ५० डॉक्टरांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. यात मुंबई आणि पुणे विभागातील डॉक्टरांची संख्या अधिक आहे.

खासगी डॉक्टर थेट करोना रुग्णांना सेवा देत नसले तरी यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांमार्फत लागण होण्याची संभावना असल्याने या डॉक्टरांचाही योजनेत समावेश करण्याची मागणी होती. करोनामुळे मृत्यू झालेले आयएमएचे सदस्य डॉक्टर करोना काळात रुग्णसेवा देत होते का, याची खात्री करून तसे मान्यतापत्र जोडले जाईल. परतावे दाखल करण्याची प्रक्रिया आयएमने सुरू केली आहे. आयएमएसह इतर पॅथीच्या डॉक्टरांनाही हा नियम लागू असल्याचे असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.