19 February 2019

News Flash

विमा नसलेल्या गोविंदांना बंदी

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना तो कोसळून गोविंदा जायबंदी होण्याची शक्यता असते.

(संग्रहित छायाचित्र)

आठशेपैकी साडेपाचशे पथकांकडून आतापर्यंत विमा

दहीहंडी समन्वय समितीने न्यायालयाला दिलेल्या हमी आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार गोविंदा पथकांनी गोविंदांचा विमा काढणे आवश्यक आहे. त्या शिवाय पथकांना स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवाना देण्यात येणार नाही. मात्र दहीहंडीला आता अवघे चार दिवस उरले असताना मुंबईतील ८०० हून अधिक गोविंदा पथकांपैकी गुरुवारी सायंकाळपर्यंत ५२५ गोविंदा पथकांनी विमा काढल्याचे समोर आले आहे.

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना तो कोसळून गोविंदा जायबंदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा काढणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गोविंदा पथकांच्या विम्याबाबत दखल घेतली होती. विम्याशिवाय गोविंदा पथकांना परवानगी आणि ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊ  नये अशा सूचना न्यायालयाने पोलिसांना केल्या होत्या. मात्र दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ न ठेपला असतानाही मुंबईतील अनेक गोविंदा पथके विम्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहेत. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत गोविंदा पथकांचा विमा काढला जातो. दहीहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत साधारण ८०० हून अधिक गोविंदा पथके आहेत. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत ५२५ गोविंदा पथकांनी विमा काढला होता, अशी माहिती ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे साहाय्यक प्रबंधक सचिन खानविलकर यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनीही कडक भूमिका घेतली आहे. विमा कागदपत्रे नसल्यास गोविंदांना परवानगी देण्यात येणार नाही, असे पोलीस उपायुक्त आणि मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले.

गोविंदा पथकांना विमा बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयाचे दहीहंडी उत्सव समन्वयक समितीने स्वागत केले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले जातात. थर कोसळून अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच असणे आवश्यक आहे, असे सुरेंद्र पांचाळ यांनी सांगितले. विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ ऑगस्ट आहे. तरी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने शनिवारी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर गोविंदा पथकांनी विमा काढावा, असे आवाहन समितीने गोविंदा पथकांना केले आहे.

विम्याची प्रक्रिया

प्रत्येकी ७५ रुपये भरून हा विमा काढला जातो. ज्या दिवशी विमा काढला त्या दिवसापासून ते दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. यात सरावावेळी झालेला अपघाताचा परतावा मिळतो. विमा परताव्यासाठी जखमी गोविंदाचे नाव, विमा प्रमाणपत्राची प्रत किंवा छायाचित्र आणि ई-मेल पत्ता इत्यादी माहिती ९८३३१३२२२५ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे किंवा sachin.khanvilkar@orientalinsurance.co.in या ई-मेल पत्त्यावर स्वीकारली जाते.

गोविंदा पथकांना विमा काढणे अनिवार्य आहे. जी पथके विमा काढणार नाही त्यांना वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही.

– मंजुनाथ सिंगे, प्रवक्ते मुंबई पोलीस

आम्ही २००३ पासून दरवर्षी विमा काढतो. विमा काढताना अपघात होईलच असा नकारात्मक विचार नसतो. जी पथके विमा काढत नाहीत, त्यांनी विम्याचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.

– विजय निकम, समन्वयक, जय जवान गोविंदा पथक

First Published on August 31, 2018 3:12 am

Web Title: non insurance govindas are ban