व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून या परीक्षेत प्रश्नपत्रिकांचे वाटप करत असताना श्रेयांक पद्धतीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ६० ऐवजी १०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला. हा प्रकार केवळ ‘जमनालाल बजाज इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेत परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांच्याच बाबतीत घडला आहे.
‘मास्टर इन फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या पदवीच्या द्वितीय वर्षांत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. यामध्ये श्रेयांक पद्धती लागू करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ६० गुणांची प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात २६ नाव्हेंबर रोजी ‘इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर’ या विषयाच्या परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना १०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार केवळ ‘जमनालाल बजाज इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेत परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतच घडला.
परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या परीक्षा केंद्रावर असलेल्या आपल्या मित्रांकडे याविषयी चौकशी केली असता त्यांना ६० गुणांचीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही केंद्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडविण्यासाठी तीन तास देण्यात आले होते. यामुळे ६० गुणांची प्रश्नपत्रिका मिळालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्तीचा वेळ मिळाला अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. या परीक्षेसाठी सुमारे १५० विद्यार्थी बसले होते.
याबाबत विद्यापीठाशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला ‘स्केलिंग डाऊन’ पद्धतीचा वापर केला जाईल असे सांगितले, मात्र हा पर्याय चुकीचा असल्याचे मत युवा सेनेचे सदस्य व विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले. हा विषय परीक्षा मंडळाच्या बैठकीत आणून याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य तो निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
दरम्यान, चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची माहिती आम्हाला तोंडी मिळाली असून याबाबत योग्य ती माहिती घेतली जाईल असे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाईल असेही त्या म्हणाल्या.