पु. लं. देशपांडे यांच्या नावाची चर्चा असताना लोकप्रतिनिधींकडून उद्योजकाच्या नावाचा प्रस्ताव

‘अर्थ’पूर्ण हिंदुत्ववादाचा अजेंडा हाती घेऊन मराठी साहित्यिक आणि कलाकारांना विसरलेल्या लोकप्रतिनिधींनी विलेपार्ले येथील उद्यानालाही अमराठी उद्योजकाचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘पुलं’च्या घरामागेच असलेल्या या जागेचा ताबा पाच वर्षांपूर्वी पालिकेकडे आल्यावर या उद्यानाला पु लं. देशपांडे यांचे नाव देण्याचा विचार झाला होता. मात्र ‘अर्थसत्ते’ने महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला बाजूला लोटले. दोन महिन्यापूर्वीच नेहरू रोडवरील चौकाला अज्ञात उद्योजक महिलेचे नाव दिल्यानंतर आता पाल्र्यातील मैदानांवरही मराठी ठसा उमटणार नसल्याने पार्लेकरांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

विलेपार्ले येथील नेहरू रोड व मालवीय रोड येथील चौकाला पार्लेकरांना अज्ञात असलेल्या लक्ष्मीबेन छाडवा यांचे नाव दिल्याबद्दल पार्लेकरांमध्ये चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला आता नवीन वळण मिळाले आहे. मालवीय रोडवरील उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण होत आले असून या उद्यानाला अमराठी उद्योजकाचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रभाग समितीत मंजुरही करण्यात आला आहे. पुलंच्या घरामागेच असलेल्या या उद्यानाची कथाही रंजक आहे. भूभाग क्रमांक ११२ ही जागा एका विश्वस्त संस्थेच्या ताब्यात होती. त्यांनी ती एका विकासकाला विकलीही होती. मात्र या जागेवर मोकळ्या जागेचे आरक्षण असल्याने त्याचा ताबा विकासकाला मिळण्यात अडचणी होत्या. आरक्षित जागेचा ताबा पालिकेने दहा वर्षांत घेतला नाही तर ती जागा संबंधिताला आपसूक मिळते. ‘ही जागा पालिकेकडे येण्यासाठी मी प्रयत्न केले. २००७ पासून सातत्याने कोकणभवन, मंत्रालय, महापालिका असा पाठपुरावा करून २०१३ मध्ये ही जागा पालिकेच्या ताब्यात आली. या जागेचे पैसे पालिकेने ट्रस्टच्या नावाने न्यायालयात जमाही केले. संपूर्ण महाराष्ट्राला साहित्याची गोडी लावणाऱ्या पुलंचे नाव या उद्यानाला देणार असल्याची पत्रकेही मी वाटली होती व ती बातमी पाल्र्याच्या स्थानिक नियतकालिकात छापूनही आली होती,’ असे तत्कालीन नगरसेवक चंद्रकांत पवार यांनी सांगितले. मात्र पाच वर्षांत ही कथा इतिहासजमा करण्यात आली असून मराठी पार्लेकरांवर अमराठी उद्योजकांची नावे रुजवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

‘उद्योजकाचे नाव कोणत्या अर्थबळावर?’

पुलंच्या इच्छेपोटी संगीतालय उभारण्यासाठी पार्ले येथील या उद्यानात छोटासा कोपरा द्यावा, अशी विनंती पुलंचे कुटुंबीय आणि पार्लेपंचम संस्थेने लोकप्रतिनिधींकडे केली होती. मात्र ‘मोकळ्या मैदानाची जागा कशालाही देता येत नाही’, असे सांगत लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. याच मैदानाला कोणतेही समाजकार्य न केलेल्या उद्योजकांचे नाव कोणत्या अर्थबळावर दिले जाते, असा प्रश्न पार्लेकर उपस्थित करत आहेत. पुलंसारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असताना पैशांच्या जोरावर उद्यानाला इतर कोणाचे नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उद्यानाला पुलंचे नाव द्यावे, असे पत्र पालिकेचे वॉर्ड अधिकारी, आयुक्त तसेच स्थानिक आमदार व नगरसेविकेला दिली आहेत, असे मनसेचे मिलिंद कोरगावकर म्हणाले.

चौकाच्या नामकरणाविरोधात मनसेचे आंदोलन

विलेपार्ले येथील पुलं, विजय तेंडुलकर, सतीश दुशाषी, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, माधव वाटवे अशा मोठय़ा व्यक्तींना डावलून कोणतेही समाजकार्य न केलेल्या लक्ष्मीबेन छाडवा यांचे नाव नेहरू रोड चौकाला दिल्याप्रकरणी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. लक्ष्मीबेन छाडवा यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती आम्ही पालिकेच्या विभाग कार्यालयात मागितली आहे. मात्र आठवडा उलटूनही त्यावर काही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पार्लेकरांकडून स्वाक्षरी मोहीमही काढण्यात येणार आहे, असे मनसेचे मिलिंद कोरगावकर म्हणाले.