संदीप आचार्य 
मुंबईतील करोना रुग्णांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि सामान्य रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या नायर रुग्णालयाने सोमवारपासून करोनाव्यतिरिक्तच्या सामान्य रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबईतील करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने नायर रुग्णालय हे पूर्णपणे करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १०४३ बेड हे करोना रुग्णांसाठी पूर्णपणे राखीव ठेवण्यात येऊन करोनाव्यतिरिक्तच्या अन्य आजाराच्या रुग्णांना केईएम व शीव रुग्णालयात पाठवले जात होते.

“शीव व केईएम रुग्णालयातही करोनासाठी जवळपास पाचशे बेड राखून ठेवण्यात आले होते. मात्र या दोन्ही प्रमुख रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात करोनाच्या पहिल्या दिवसापासून अन्य आजाराच्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जात होती. तसेच अत्यावश्यक रुग्णांना दाखल करून त्यांच्या शस्त्रक्रियाही केल्या जात होत्या. प्रामुख्याने केईएम रुग्णालयात करोनापूर्वी बाह्यरुग्ण विभागात दररोज सहा ते आठ हजार रुग्णांची तपासणी केली जायची मात्र करोनाच्या काळात साधारणपणे हजार ते बाराशे रुग्णांची तपासणी होत होती”, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. याचप्रमाणे अत्यावश्यक शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात होत असून रोज साधारण ३० ते ४० शस्त्रक्रिया केल्या जातात असे डॉ. हेमंत देशमुख म्हणाले.

तथापि करोनाचे रुग्ण जसे वाढू लागले तसे पालिका प्रशासनाने संपूर्ण नायर रुग्णालय हे फक्त करोना रुग्णांवरील उपचारासाठी राखून ठेवले. त्यासाठी रुग्णालयाच्या रचनेत बदल करण्यात आले. “रोगचिकित्सा विभागासह काही विभाग अन्यत्र हलविण्यात आले तसेच ऑक्सिजन बेड वाढविण्यापासून अतिदक्षता विभागाचे नियोजन बदलले गेले. महापालिकेने नायर रुग्णालय शिवाय बीकेसी , महालक्ष्मी, वरळी, गोरेगाव, दहिसर व मुलुंड येथे तात्पुरती रुग्णालये सुरु केली. एकीकडे रुग्णालयीन व्यवस्था वाढवतानाच दुसरीकडे चाचण्यांची संख्या वाढवणे, करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोक शोधून तातडीने उपचार करणे यावर भर देण्यात आला. यातूनच मुंबईत चाचण्यांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना दुसरीकडे रुग्णसंख्या कमी होत गेली. त्यातही रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्या”चे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

“गेल्या महिन्यात साधारणपणे दररोज १३०० ते १५०० करोना रुग्ण दिसत होते तेच प्रमाण आता १२०० ते १००० च्या दरम्यान आले असून अॅक्टिव्ह म्हणजे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दोनशे ते अडीचशेवर येऊन ठेपले आहे. यामुळे दररोज जवळपास सात हजार बेड रिकामे राहातात तर अतिदक्षता विभागातील अडीचशेच्या आसपास बेड रिक्त राहात असल्या”चे आयुक्त चहल म्हणाले. करोनाच्या सुरुवातीपासून पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयावर उपचाराचा मोठा भार पडला. आमच्या डॉक्टरांनी तो समर्थपणे पेलला. त्यामुळे आता आम्ही करोनाच्या रुग्णांना प्राधान्याने खासगी व आमच्या अन्य तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांना पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

“आता मुंबईतील करोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने नायर, शीव व केईएममधील करोना रुग्णांसाठी राखीव असलेले बेड मोठ्या प्रमाणात रिकामे राहात असल्या”चे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. या सर्वांचा आढावा घेऊन नायर रुग्णालयात उद्याच्या सोमवारपासून आम्ही पुन्हा सामान्य रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. जोशी म्हणाले. येथील डोळ्याचा विभाग व ह्रदयविकार विभागाचे काम यापूर्वीच सुरु करण्यात आले असून अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीचे काम सुरु झाले आहे तसेच नेत्रशस्रक्रियाही करण्यात येत असून आता सामान्य रुग्णांच्या तपासणीला प्राधान्य देण्यात आल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

प्लाझ्मा उपचार

करोना रुग्णांना प्लाझ्मा उपचार देण्यासाठी नायरसह प्रमुख रुग्णालयांच्या मध्यमातून धारावीत प्लाझा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नायर रुग्णालयात जवळपास अडीचशे लोक प्लाझ्मा दान करतील असा अंदाज आहे. कालपर्यंत पन्नास दात्यांची चाचणी करण्यात आली अाहे. जे रुग्ण करोनातून बरे झाले आहेत व ज्यांच्या शरीरात पुरेशा अॅण्टीबॉडी तयार झाल्या आहेत अशांना प्लाझ्मा दान करता येते. यासाठी १६ ते ६० वयोगटातील व ज्यांचे वजन पन्नास किलो पेक्षा जास्त आहे अशांकडूनच प्लाझ्मा घेतला जातो व करोनाच्या रुग्णांना तो दिला जातो, असे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. नायर रुग्णालयात आजपर्यंत ४० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले असून पालिका रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात प्लाझ्मा द्यावयाचा झाल्यास त्यासाठी दहा हजार रुपये आकारण्यात यावे असा प्रस्ताव प्रशासनाकडे आपण सादर केल्याचे डॉ. मोहन जोशी म्हणाले