News Flash

राज्यासह देशभरात यंदा सर्वसाधारण पाऊस

‘स्कायमेट वेदर’चा अंदाज

‘स्कायमेट वेदर’चा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात मोसमी पावसाचे प्रमाण यंदा सर्वसाधारण असून दीर्घकाळ सरासरीच्या (लाँग पीरिअड अ‍ॅव्हरेज) १०३ टक्के  पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होईल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ संस्थेने मंगळवारी वर्तवला.

कोकण किनारपट्टी आणि गोव्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल; मात्र मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात सर्वसाधारण पाऊस होईल, असे या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण मोसमात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट या मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाच्या कालावधीत कर्नाटकातील अंतर्गत भागांतही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या प्रारंभी जून महिन्यात आणि अखेरीस म्हणजेच सप्टेंबरमध्ये देशभरात जोरदार पावसाचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.

‘अल निनो’ स्थितीमध्ये प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि याचा परिणाम म्हणून देशातील मोसमी पाऊस कमी होतो. यंदा मात्र ‘अल निनो’ स्थिती उद्भवण्याची शक्यता नाही. या उलट, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होऊन देशातील मोसमी पावसाच्या प्रमाणात वाढ होईल; म्हणजेच ‘ला निना’ स्थिती निर्माण होईल. त्यामुळे मोसमी पावसाच्या दीर्घकाळ सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के  पाऊस होण्याची शक्यता ६० टक्के  आहे. सर्वाधिक म्हणजेच २८५.३ मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात होईल. सर्वसाधारण पाऊस होण्याचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे. यापूर्वी १९९६, १९९७ आणि १९९८ अशी सलग ३ वर्षे सर्वसाधारण पाऊस झाला होता.

नेमका किती?

जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाची आतापर्यंतची दीर्घकाळ सरासरी ८८०.६ मिलिमीटर आहे. सरासरीच्या १०३ टक्के  पाऊस यंदाच्या मोसमात होणार आहे. ९६ ते १०४ टक्के  पाऊस सर्वसाधारण समजला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:22 am

Web Title: normal rainfall this year across the country including maharashtra zws 70
Next Stories
1 बिनदिक्कत प्रवासासाठी बनावट ‘निगेटिव्ह’ अहवालांचा आधार
2 दुकानांच्या अर्धबंद दारांतून खरेदीची लगबग
3 हिटलरच्या आत्मचरित्रातून ‘एलएसडी’ची तस्करी
Just Now!
X