वैद्यकीय, अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘वन नेशन, वन सीईटी’ या घोषणेचे समर्थन करताना राजस्थानातील ‘कोटा’ येथील क्लास-संस्कृतीमुळे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड काढून टाकण्याचा इरादा त्यावेळचे ‘केंद्रीय मनुष्यबळ विकास’ मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला होता. क्लास-संस्कृतीचे महत्त्व कमी होऊन कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थेला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे  शिक्षणाच्या नावाने उघडलेली कोटय़ातल्या दुकानांची ‘शटर्स’ अध्र्यावर आली असतीलही, पण राज्याराज्यात ‘शिक्षणाच्या दुकानांना’ बहर आला आहे. महाराष्ट्रातही दिल्लीतील प्रकाशन संस्थांना सुगीचे दिवस आले. इथल्या काही महत्त्वाकांक्षी क्लासचालकांबरोबर ‘टायअप’ करून आता कनिष्ठ महाविद्यालयातच ही दुकाने थाटण्यात आली आहेत. शिक्षकांना लाखोंची पॅकेजेस देऊन क्लासचालकांनी ‘कोटा’च इथे आयात केला आहे. ‘शिक्षणाच्या या दुकानदारी’ने शिक्षणक्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाचा आढावा घेणारी ही मालिका..
दिल्ली, मेरठ या उत्तर भारतातील शहरांतील मार्गदर्शन, संदर्भ वा स्वयंअध्ययनाची पुस्तके लिहिणाऱ्या प्रकाशन संस्थांसाठी नीट, जेईई-मेन्स या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा भाग्योदयाच्या ठरल्या आहेत. डॉक्टर, इंजिनिअर बनणाऱ्या राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला भविष्यात याच परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे सीईटीच्या तयारीसाठी राज्यातील प्रकाशन संस्थांची आतापर्यंत प्रचलित असलेली पुस्तके कुचकामी ठरून उत्तरेकडील प्रकाशन व्यवसाय बहरू लागला आहे.
महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांंना आतापर्यंत ‘एमएचटी-सीईटी’ या राज्य सरकारच्या सामायिक प्रवेश परीक्षेला बसावे लागत होते. ही परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (एचएससी) अभ्यासक्रमावर आधारलेली होती. त्यामुळे राज्यातील प्रकाशन संस्था १९९९ ते २०१२ पर्यंत (एमएचटी-सीईटी आल्यापासून) एचएससी अभ्यासक्रमावर आधारित स्वयंअध्ययनाची मार्गदर्शन पुस्तके राज्यातील एचएससी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने तयार करीत. पण, आता ही पुस्तके कुचकामी ठरू लागली आहेत. कारण, अभियांत्रिकी वा वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या जेईई-मेन्स व नीट (नॅशनल एजिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षांचे गुण स्वीकारण्याचे राज्य सरकारने ठरविल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षा देणे भाग आहे.