मालवणीत कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही!

अतिक्रमण केलेल्या जागेवरील घरांमधून व कारखान्यांमधूनच कचरा नाल्यात फेकला जात असल्याने गाळ साचतो, ही महानगरपालिकेची तक्रार खरी असली तरी मालवणीसारख्या परिसरात कचरा टाकण्यासाठी व तो उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे का, याचे उत्तर आधी पालिकेला द्यावे लागेल. दुर्दैवाने ही मूलभूत सेवाच या भागात पुरवण्यात न आल्याने कचऱ्याला नाल्यातूनच वाट फुटते. या भागात गाळाची समस्या कायम राहते ती त्यामुळेच.

या प्रश्नावर स्थानिक राजकारण्यांनाही तोडगा काढता आलेला नाही. केवळ ‘व्होट बँक’ सांभाळण्यासाठी अधूनमधून गटारे साफ करण्यासारखे वरवरचे उपाय योजले जातात. त्यामुळे नाल्यात कचरा टाकणाऱ्या रहिवाशांसोबत पालिका व राजकारणीही या नाल्यातील कचऱ्यासाठी कारणीभूत आहेत.

संपूर्ण शहराचे नाले साफ केले तरी मालवणी परिसरातील नाल्यात कचऱ्याचे चित्र हमखास दिसणार हा वर्षांनुवर्षांचा अनुभव. हे वर्षही त्याला अपवाद नाही. मालाड पश्चिमेला मुस्लीम आणि दाक्षिणात्यबहुल असलेल्या या परिसरात घरांसोबतच अनेक कारखाने, लघुउद्योग आहेत. मालवणीतील नाल्याच्या दोन्ही बाजूंने दोन ते तीनमजली बांधकामे झाली आहेत. ती हटवणे पालिकेच्या हाताबाहेर गेले आहे. या बांधकामांमधून थेट नाल्यात सांडपाणी सोडले जाते. आजूबाजूच्या वस्तींतील लोकही घरातील कचरा थेट नाल्यात फेकतात.  कापड कारखान्यातील चिंध्याही सर्रास नाल्यातच येऊन पडतात. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी नाला साफ करूनही पुन्हा गाळ साठल्याबद्दल या परिसरातील कोणालाही फारसे आश्चर्य वाटले नाही.

कचरापेटीची दरुगधी नको म्हणून..

आम्ही अनेक वर्षे कचरापेटीची मागणी करत आहोत. गेल्या वर्षी नाल्याच्या बाजूला ती ठेवली गेली. मात्र कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने कचरापेटी समोर असलेल्या लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली आणि ती उचलून नेण्यात आली. दुसरी कचरापेटी पाच मिनिटे दूर आहे. तेवढय़ा लांब जाण्याऐवजी लोक नाल्यात कचरा टाकतात, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. कचरापेटीची घाण नको असलेले रहिवासी घाणीने भरलेल्या नाल्याची दरुगधी कशी सहन करतात, या प्रश्नाने मात्र ते निरुत्तर झाले. पाच मिनिटांवर कचरापेटी आहे. मात्र तिथवर जाऊन कचरा टाकण्याऐवजी जवळच्या नाल्यात कचरा टाकण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे उत्तर नाल्याच्या काठावरील कारखान्यात शर्ट तयार होणाऱ्या कारखान्यातील कामगाराने दिले. मात्र ही मानसिकता बदलण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहीम नजीकच्या काळात आखली गेली नाही, हेदेखील वास्तव आहे.

पावसाळ्यापूर्वी नाला स्वच्छ होणे कठीण

नाल्याच्या पलीकडे, मालवणी गेट क्रमांक सहामधील लहान गटारेही गाळाने भरली आहेत. ती साफ करण्याचे कामही सुरू आहे. मात्र महानगरपालिकेऐवजी स्थानिक आमदाराच्या निधीतून हे काम चालल्याची माहिती गटार साफ करणाऱ्या कामगारांनी दिली. नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत असले तरी मालवणीतील नाला पावसापूर्वी पन्नास टक्क्य़ांहून अधिक स्वच्छ होणे अशक्य आहे, असेच वास्तव आहे.