शिवसेनेची स्पष्ट भूमिका; सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे बंदचा परिणाम जाणवण्याची शक्यता
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर माथाडी कामगारांनीही पाठिंबा जाहीर केल्याने नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समित्याही बंद राहतील. संवेदनशील भागांमध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील रेल्वे, बेस्ट, रिक्षा-टॅक्सी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. हा बंद राजकीय नसल्याने कोणीही सर्वसामान्य नागरिकांवर बंदची सक्ती करू नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर के ल्याने बंद कडकडीत पाळला जाईल, अशी चिन्हे आहेत. शिवसेना बंदमध्ये असल्यास सारे व्यवहार बंद होतात, असा नेहमीचा अनुभव. या वेळी मात्र शिवसेनेने बंदची जबरदस्ती नको, अशी भूमिका घेतली आहे.
बंदचा सामान्य नागरिकांना फटका बसू नये तसेच दुकाने व व्यवहार बंद राहिले तरी बेस्ट, रेल्वे सेवा सुरू राहील, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. मूठभर भांडवलदारांसाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शेतमाल-भाजीपाला आदी विक्री न करता राज्यातील बाजार समित्याही बंद राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
केंद्र सरकारने चर्चेविना अमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केटसह राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आदी सर्व बाजार समित्या बंद राहतील असे सांगण्यात आले.
भारत बंद राज्यात शांततेत पार पडावा यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्जता ठेवण्यात आली असून राज्यभरात चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत मुख्य सचिव संजय कु मार यांनी पोलिसांना, सुरक्षा यंत्रणांना निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त
- मुंबई : बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
- प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्क राहून आंदोलनाच्या निमित्ताने कायदा हाती घेणाऱ्या प्रत्येकाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त परमबिर सिंग यांनी दिल्या आहेत.
- पोलीस दलाचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या निमित्ताने शहरात कोठेही धाकदपटशा दाखवत दुकाने, व्यवसाय किं वा सार्वजनिक वाहतूक बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत.
मालवाहतूकदारांचा सहभाग
मुंबई : ‘भारत बंद’ला मालवाहतूकदारांच्या संघटनांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी मालवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस’ने (एआयएमटीसी) पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
अण्णा हजारे यांचे आज उपोषण
पारनेर : शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मंगळवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. दरम्यान हजारे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन संपूर्ण देशभर सुरू झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.केंद्रात तसेच राज्यातील कृषिमूल्य आयोगाकडून जो शेतमालाच्या खर्चाचा अभ्यास केला जातो त्याचा विचार करून शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
ओला, उबेर सेवांवर परिणाम
भारत बंदला ओला, उबेर संघटनांनी पाठिंबा जाहीर करत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन चालकांना के ले आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ओला, उबेर सेवा बंद राहतील. मात्र बंदमध्ये सामील होण्यासाठी चालकांवर कोणतीही जबरदस्ती के लेली नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांना सहभागी होण्याचे आवाहन के ल्याचे ते म्हणाले.
पुढील आठवडय़ात लाक्षणिक संप
राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी राज्यातील बाजार समित्या व इतर व्यवसायातील तमाम माथाडी कामगारांचा दि.१४ डिसेंबर लाक्षणिक संपाचा इशारा नरेंद्र पाटील व आ. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करणे, सल्लागार समितीची पुर्नरचना, विविध माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना,त्यावर संघटनांच्या सभासद संख्येच्या प्रमाणातो नेमणुका करणे अशा काही मागण्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:28 am