करोना विषाणूच्या विरोधात राज्य सरकारने निर्णाय लढाई सुरू केली आहे, परंतु केंद्र सरकारकडून मदतीचा आखडता हात घेतला जात आहे. विशेषत: पुरेसे वैद्यकीय साहित्य मिळत नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोरात यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, करोना विषाणूचा पहिला रुग्ण राज्यात सापडला त्या दिवसापासूनच महाविकास आघाडी सरकारने त्यावर मात करण्यासाठी पावले उचलली आहेत.

करोनानंतर उद्भवलेली परिस्थिती राज्य सरकार समर्थपणे हाताळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून पीपीई कीटसह आवश्यक वैद्यकीय मदत मोठय़ा प्रमाणात मिळणे अपेक्षित असताना ती मिळत नाही, असे थोरात म्हणाले.

भाजपकडून वांद्रे जमावाचे राजकारण

रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे वांद्रे येथे गर्दी झाली होती, परंतु त्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा व त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा  विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न के ला अशी टीका  थोरात यांनी के ली. ते म्हणाले, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राज्य सरकारवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाच, परंतु अमित शहा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. ही तत्परता त्यांनी सुरत, हैदराबादमध्ये आणि दिल्लीत का दाखवली नाही?