विशेष मुलांना नेहमीच वेगवेगळ्या श्रेणींत ठेवले जात असून त्यांना गतिमंद, विकलांग असे शब्द वापरले जातात. मात्र, त्यांना असे शब्द वापरणे चुकीचे असून तुमच्या-आमच्यापेक्षाही त्यांच्यात जास्त गुण असतात. त्यामुळे ते ‘डिफरंटली एबल’ आहेत, असे मत हिंदी चित्रपटविश्वातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केले. तसेच या मुलांसाठी माझा आवाज किंवा चेहऱ्याची आवश्यकता वाटली तर मी त्यांच्यासाठी सदैव हजर असेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात अपंग दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल, ठाणे जिल्हा परिषद आणि राजाभाऊ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात अमिताभ बच्चन बोलत होते. मुले हे देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहित करणे आणि महत्त्वपूर्ण स्थान देणे, हे आपले काम आहे. समाजात काही विशेष मुले असतात. त्यांच्यामध्ये वेगळे गुण असतात. त्यामुळे ते वेगळे नाहीत, अशी भावना समाजाने त्यांच्यापुढे निर्माण करायला हवी आणि ते आपले काम आहे, असेही ते म्हणाले. शरीराचा एक अवयव जेव्हा काम करत नाही, त्या वेळी काय वेदना आणि त्रास होतो याची मला जाणीव आहे. कारण माझ्या आयुष्यात अशी घटना घडली आहे. मात्र समाजात असेही लोक आहेत, ज्यांची व्यंगे दूर होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांचे दु:ख समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 आयोजकांचे ‘फोटो सेशन’
अपंग दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला येण्याचे सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मान्य केले. पण, मुळात ज्या विशेष मुलांसाठी अमिताभ यांनी येण्याचे मान्य केले होते. त्या मुलांना आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे अमिताभना भेटताच आले नाही. विशेष म्हणजे मैदानात सुरू असलेल्या मुलांच्या परेडला अमिताभ सलामी देत असताना आयोजकांची मात्र त्यांच्या शेजारी उभे राहून फोटो सेशन करण्याची चढाओढ सुरू होती.  
त्याचा देव भेटला..
दिनेश नवले हा गतिमंद मुलगा अमिताभचा जबरदस्त चाहता. गेल्या काही वर्षांपासून तो घंटाळी येथील विश्वास या संस्थेत शिकत आहे. अमिताभचा सिनेमा पाहून त्यांच्या प्रेमात पडलेल्या दिनेशकडे सुपरस्टार्सच्या छायाचित्रांचा भला मोठा संग्रह आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर अमिताभचा फोटो असलेला कागद पडला असेल तरी तो उचलून त्याच्या पाया पडतो. त्यामुळे अमिताभ त्याच्यासाठी देव आहे, अशी माहिती विश्वास संस्थेतील चित्रकलेचे शिक्षक शैलेश साळवी यांनी दिली. सोमवारी त्याने तब्बल पाच तास खपून अमिताभचे कॅनव्हासवर पेंटिंग केले. मंगळवारी त्याने जेव्हा अमिताभला ते चित्र दिले, तेव्हा त्याला साक्षात त्याचा देव भेटला. अमिताभनेही त्याच्या कलेचे कौतुक केले.