आंतरराष्ट्रीय शिक्षणमंडळाच्या अभ्यासक्रम समितीवर डॉ. विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर ही नामवंत मंडळी होती असा दावा भाजपचे नेते करतात. पण भाटकर हे एकाच बैठकीला आले होते व माशेलकर उपस्थितच नव्हते. मग हा अभ्यासक्रम तयार केला कोणी असा सवाल करत या मंडळाच्या कामात गैरप्रकार झाल्याचे दिसून आले असून ते खपवून घेणार नाही, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी विधानसभेत दिला.

अर्थसंकल्पातील शिक्षण विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना वर्षां गायकवाड यांनी मागील भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. आंतरराष्ट्रीय शिक्षणमंडळाच्या अभ्यासक्रमावरून वाद झाले व टीका झाली. महाविकास आघाडी सरकारने हे मंडळ बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. पण ते दावा करतात त्या नामवंतांनी अभ्यासक्रम ठरवण्याच्या बैठकांना हजेरी लावलेली नाही. मग हा अभ्यासक्रम कोणी तयार केला. त्यास कोणी मान्यता दिली, असा सवाल वर्षां गायकवाड यांनी केला. त्याचबरोबर या मंडळाच्या कारभारात गैरप्रकार झाले आहेत. ते खपवून घेणार नाही, असेही गायकवाड यांनी ठणकावले.