*स्थायी समितीत प्रशासन व सदस्यांत खडाजंगी
* नव्या कंत्राटदारांची अद्याप नियुक्ती नाही
नालेसफाईच्या कामासाठी नव्या कंत्राटदारांची अद्याप नियुक्ती न केल्यामुळे शहरातील अनेक नाले गाळाने तुडुंब भरले असल्याची बाब सदस्यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या मुद्दय़ावरून स्थायी समिती सदस्य आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली. या विषयासंदर्भात नव्याने निविदा मागविण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नालेसफाईच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे नालेसफाईचे कंत्राट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी रद्द केले आहे. त्यानंतर नवे कंत्राटदार अद्याप नेमण्यात आलेले नाहीत. यामुळे पावसाळ्यात होणारी २० टक्के आणि पावसाळ्यानंतर होणारी २० टक्के सफाई झाली नसल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. शहर विभागासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाले गाळाने भरले असून सुमारे दीड ते दोन हजार मेट्रिक टन गाळ साचला असल्याचे या सदस्यांनी सांगितले. विष्णू गायकवाड (अपक्ष), अनिषा माजगावकर (मनसे), विनोद शेलार (भाजप) आदींनी आपली मते व्यक्त केली. अतिरिक्त महापालिका आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी कंत्राटदारांसाठी नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगून त्यानंतर युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम केले जाईल, असे सांगितले.