ग्राहक नसल्याने रात्री ८ वाजताच ‘शटर डाऊन’; चलन तुटवडय़ामुळे ग्राहकांची पाठ

फॅशनेबल कपडे, चपला यांबरोबरच नानाविध गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीकरिता प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीट, क्रॉफर्ड मार्केट या बाजारांमध्ये सध्या ग्राहकांअभावी रात्री आठ वाजताच ‘शटर डाऊन’ होते आहे. एरवी हे बाजार सकाळी १० वाजता सुरू होऊन रात्री ११ वाजेपर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असतात. परंतु सध्या धंदा मंदावल्याने येथील दुकाने सकाळी ११ वाजता उघडून रात्री आठ वाजताच बंद होत आहेत.

पाचशे-हजाराच्या नोटाबंदीची सर्वाधिक कळ सर्वसामान्यांपेक्षा अधिक व्यापारीवर्गाला सोसावी लागते आहे. सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ामुळे ग्राहक फारसे फिरकत नसल्याने फोर्ट परिसरातील या दोन प्रमुख बाजारांनाही यामुळे गेला आठवडाभर अवकळा आली आहे. सुरुवातीला येथील व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारल्या. परंतु बँकांकडून र्निबध आल्यामुळे त्यांनी या नोटा स्वीकारणे थांबविले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत येथील व्यापार ८० ते ८५ टक्क्यांनी कमी झाला आहे. पैसे नसल्याने फारच थोडे ग्राहक खरेदीसाठी फिरकत आहेत.

रोजच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नावर आमचा उदरनिर्वाह होतो. पण आता या निर्णयामुळे धंदा अगदीच बसल्याने दिवस ढकलणे कठीण बनले आहे, अशा शब्दात येथील चप्पल विक्रेते जयकुमार यांनी खंत व्यक्त केली. ग्राहक नसल्याने एरवी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत खुली असणारी इथली दुकाने सध्या सकाळी ११ वाजता उघडून रात्री ८ वाजताच बंद होत आहेत.

जयकुमार, चप्पल विक्रेता.

थंडीत सुकामेव्याला चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीनंतरही क्रॉफर्ड मार्केटचा सुकामेवा बाजार ग्राहकांनी गजबजलेला असतो. परंतु सध्या ग्राहकांअभावी येथील धंदा जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी खालावला आहे. ‘माल विकला जावा म्हणून अजूनही आम्ही जुन्या नोटा स्वीकारतो आहोत. परंतु ग्राहकच फिरकत नसल्याने आमची अडचण झाली आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने काही दिवसांनी दुकान काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

दीपक कुकरेजा, सुकामेवा आणि चॉकलेट्स विक्रेते.

फॅशन स्ट्रीट’मध्ये एक ग्राहक दोन-तीन हजार मालाची खरेदी सहज करतो. परंतु आता धंदा एकदम बसला आहे,’ अशी प्रतिक्रिया फॅशन स्ट्रीट येथील कपडय़ांचे विक्रेते ईश्वरचंद्र राजवर यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना दिली. ग्राहकांची गर्दी इतकी असते की आम्हाला बसायला वेळ मिळत नाही. परंतु आता ग्राहकांच्या प्रतीक्षेत तासन्तास बसूनच वेळ काढावा लागतो.

ईश्वरचंद्र राजवर, कपडे विक्रेता.