ज्येष्ठ पाश्र्वगायिका मुबारक बेगम यांच्या कुटुंबीयांचा आर्त सवाल
हिंदी चित्रपटसृष्टी गोड गळ्याने गाजविणाऱ्या आणि श्रोत्यांवर आपल्या गाण्यांचे गारूड करणाऱ्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका मुबारक बेगम गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मुबारक बेगम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणाऱ्या या गायिकेवर आज वयाच्या ८०व्या वर्षी लोकांपुढे हात पसरायची वेळ आली आहे. त्यांची प्रकृतीही खालावली असून ‘कभी तनहाईयों मे यूँ हमारी याद आएगी?’ असा आर्त सवाल मुबारक बेगम यांच्या कुटुंबीयांकडून विचारण्यात येत आहे.
मुबारक बेगम यांच्यावर अंधेरी येथील ‘ब्रह्मकुमारी बी.एस.ई.एस.’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे हृदयही खूप कमी क्षमतेने काम करत आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात ठेवण्यापेक्षा घरी घेऊन जाण्यास सांगितले आहे. आज (गुरुवारी) त्यांना रुग्णालयातून घरी सोडणार आहेत. रुग्णालयातील औषधोपचारांचा खर्च ६० हजारांपेक्षा जास्त झाला असून तेवढी रक्कम भरण्याचीही आमची परिस्थिती नाही. त्यामुळे आता इतकी रक्कम कशी उभी करायची, याचीच चिंता आम्हाला सतावत असल्याचे मुबारक बेगम यांची सून झरिना यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आमच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मुबारकबेगम यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहनही झरिना यांनी केले.
‘मुझको अपने गले लगा लो ए मेरे हमराही’ असे आपल्या चाहत्यांना सांगणाऱ्या मुबारक बेगम यांची सध्याची अवस्था ‘हम हाले दिल सुनाएंगे’ अशी झाली असून ‘कभी तन्हाईयों मे यूँ हमारी याद आएगी’ असा सवालच त्या अप्रत्यक्षपणे संगीतप्रेमी रसिक आणि चाहत्यांना करत आहेत..