‘हवे तर माझे मंगळसूत्र घ्या, पण औषधे द्या, माझ्या सासूची शस्त्रक्रिया इंजेक्शन आणि औषधांअभावी अडली आहे..’ धारावीत राहणाऱ्या पूजा नारकर बुधवारी केईएम रुग्णालयाबाहेरील नॅशनल केमिस्ट या औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना काकुळतीने सांगत होत्या. सुटय़ा पैशांअभावी बुधवारी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी जो मनस्ताप सोसावा लागला त्याचे हे प्रातीनिधिक उदाहरण..

धारावीत राहणाऱ्या पूजा नारकर (३९) यांच्या सासू गेले तीन दिवस मूतखडय़ाच्या त्रासामुळे सायन रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. डॉक्टरांनी बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते. यासाठी लागणारी वैद्यकीय सामग्री फक्त केईएम रुग्णालयासमोरील नॅशनल केमिस्ट येथे उपलब्ध असल्याचे कळल्यावर पूजा यांनी तिकडे धाव घेतली. मात्र बुधवारी दुपारी एकच्या सुमारास मालकाने दुकान बंद करून औषधे न विकण्याचा पवित्रा घेतला होता. ‘पाचशे रुपये सुटे असतील तरच औषधे मिळतील,’ अशा पवित्र्यामुळे दुकानासमोर रुग्णाच्या नातेवाईकांची गर्दी जमा झाली होती. त्यातच उभ्या असलेल्या पूजा नारकर यांनी, ‘माझे मंगळसूत्र घ्या, पण औषधे द्या’ अशी विनंती केल्यानंतरही दुकानाच्या मालकाने औषधे देण्यास प्रारंभी नकार दिला. त्यातच दुकानाभोवती जमलेल्या गर्दीतील एकाने पोलिसांनाही बोलाविले, मात्र तरीही मालकाने औषधे न विकण्याचा पवित्रा कायम ठेवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले. अनेकदा विनवण्या केल्यानंतर अखेर दुकानदाराने पूजा नारकर यांचे आधारकार्ड ठेवून घेत त्यांना ५३७ रुपयांची औषधे दिली.