राजधानीत सरकारदरबारी तुम्ही न्याय मागण्यासाठी आलात मात्र, या सरकारचाच खिसा फाटलेला असल्याने त्यांच्याकडून तुमच्या हाती काहीही येणार नाही, असा दावा करीत माझ्या हातात सत्ता देऊन पहा तुमच्या मागण्या पूर्ण होतात की नाही. असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना केले. उद्या विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडक देणार आहे. तत्पूर्वी आज रात्री सायन येथील सौमय्या मैदानात मोर्चेकरांनी विसावा घेतला आहे. येथे राज ठाकरेंनी मोर्चेकरांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

राज म्हणाले, राज्याच्या राजधानीत तुम्ही दाखल झाला आहात त्यामुळे तुमच्या स्वागतासाठी मी येथे आलो आहे. आपण माझ्यासमोर वीसेक मागण्या बोलून दाखवल्यात. मात्र, या मागण्या या सरकारकडून पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी एकदा राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन पहा पूर्ण होतात की नाही.

राज्यात अनेक सराकारे आली आणि गेली त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यांनी तुमचा केवळ निवडणुकीपुरताच वापर करुन घेतला, असे होऊ नये यासाठी आपल्यातला राग कायम ठेवावा असे आवाहन यावेळी राज यांनी शेतकऱ्यांना केले.

उद्या देखील हे सरकार तुमच्याशी खोटे बोलणार कारण, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असे कधीच म्हटलो नव्हतो तर, उद्योगतींना देऊ असे यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा म्हटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तुम्ही कुठल्या पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आलात याच्याशी मला कर्तव्य नाही. शेतकऱ्यांबाबत बोलताना डावे-उजवे करायला ते काय कालवे आहेत का अशा शब्दांत त्यांनी आपली भुमिका मांडली. मनसे शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे. ज्यावेळी तुम्ही हाक माराल राज ठाकरेंचा तुम्हाला पाठींबा असेल अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना अश्वस्त केले.