24 February 2019

News Flash

हुल्लडबाजी टाळण्यासाठी स्वयंसेवक नेमा!

या वेळी तरुणांच्या हुल्लडबाजीत वाहनांचे नुकसान तर झालेच त्याबरोबरच लालबाग पुलाखालील सुशोभीकरण मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाले.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान दुभाजकात लावण्यात आलेल्या रोपांचे काही तरूणांनी नुकसान केले

गणेशोत्सव मंडळांना समन्वय समितीची सूचना

चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकींदरम्यान लालबागमध्ये झालेल्या हुल्लडबाजीसारखे प्रकार टाळण्याकरिता स्वयंसेवकांची फळी उभारण्याची सूचना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळाला केली आहे.

या वेळी तरुणांच्या हुल्लडबाजीत वाहनांचे नुकसान तर झालेच त्याबरोबरच लालबाग पुलाखालील सुशोभीकरण मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाबाबत मंडळाला टीकेला सामोरे जावे लागल्याने गुरुवारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नासधूस झालेल्या भागाची स्वच्छता आणि डागडुजी केली. त्या ठिकाणी लावलेल्या रोपांचे नुकसान झाल्याने पुढील दोन दिवसांमध्ये वृक्षारोपण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत मिरवणुकीदरम्यान वाढलेल्या हुल्लडबाजीच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी मंडळांनी आपली वेगळी स्वयंसेवकांची फळी उभारावी, अशी सूचना मंडळांना करण्यात आली आहे.

चिंचपोकळी येथील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या (चिंतामणी) मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला. या वेळी गर्दी आवरताना पोलिसांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.  सुशोभीकरणामध्ये पुलाखाली उभारण्यात आलेल्या विविध शिल्पांची तोडफोड करण्यात आली, तर मार्गदर्शनासाठी लावलेले फलक आणि दुभाजकात लावण्यात आलेल्या रोपांचे नुकसान करण्यात आले. सुशोभीकरणाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यादेखील या तरुणांनी तोडल्या. शिवाय काही तरुणांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या. बेस्ट बस आणि इतर गाडय़ांवर चढून धिंगाणा घातल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाबाबत समाजमाध्यमातून टीका झाल्यानंतर मंडळाने दिलगिरी व्यक्त केली. तसेच, नासधूस झालेल्या भागाची सर्वप्रथम स्वच्छता केली. या वेळी उन्मळून पडलेल्या रोपांना काढण्यात आले. तसेच तुटलेल्या लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले. घडलेल्या प्रकारामध्ये मंडळाची चूक नसतानाही जबाबदारी म्हणून नासधूस झालेल्या भागामध्ये शोभिवंत रोपांना लावण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सुमारे २०० ते ३०० रोपांची खरेदी करण्यात येणार असून ही रोपे पुढील दोन दिवसांत रात्रीची  त्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय तुटलेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीचे कामदेखील दोन दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे सावंत म्हणाले.

चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेला प्रकार हा गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे घडला. याला मंडळ जबाबदार नसले तरी गर्दीच्या नियोजनाकडे मंडळाने लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे पुढल्या वर्षी मिरवणुकीमधील गर्दीला आवर घालण्यासाठी कार्यकत्रे कमी पडत असतील तर वेगळ्या स्वयंसेवकांची फळी उभारण्याची सूचना चिंचपोकळी मंडळाला दिली आहे.

– नरेश दहिबावकर, अध्यक्ष,

बृहन्मुंबई सार्वजनिक गणशोत्सव समन्वय समिती

First Published on September 15, 2018 4:34 am

Web Title: notice of coordination committee to ganeshotsav mandal