22 April 2019

News Flash

प्रकाश प्रदूषणाच्या तक्रारीची दखल

सर्व ठिकाणी मोठय़ा संख्येने प्रखर दिवे लावले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मेट्रो-३च्या बांधकामस्थळी प्रखर दिवे

दक्षिण मुंबईतील मेट्रो-३ च्या विविध बांधकाम स्थळांवर लावलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या उद्भवल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. त्याची दखल मेट्रो प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याची ग्वाही प्रशासनाने तक्रारदाराला दिली आहे. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ‘मुंबईची घुसमट’ या वृत्तमालिके मध्ये बुधवारी प्रकाशित केले होते.

गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रातील प्रकाश प्रदूषणाच्या पातळीने ‘उच्च’ हून ‘अत्युच्च’ पातळी गाठल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘अर्बन क्लायमेट जर्नल’मधील अभ्यासात समोर आले आहे. यातही मुंबईत प्रकाश प्रदूषणाची तीव्रता अधिक असून शहरीकरण, विविध विकास प्रकल्प, औद्योगिक विकास आणि हवेच्या प्रदूषणामुळे प्रकाश प्रदूषण अधिकाधिक तीव्र होत आहे. मरिन डाइव्ह येथील जिमखान्यांमुळे प्रकाश प्रदूषण होत असल्याची पहिली तक्रार चिराबाजार येथील रहिवासी नीलेश जाधव यांनी केली होती. त्यानंतर आझाद मैदानातील मेट्रो-३ च्या प्रकल्पस्थळी प्रखर दिव्यांचा प्रकाश आकाशात फेकला जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले होते. त्यासंबंधीची तक्रार त्यांनी जानेवारी २०१८मध्ये मेट्रो-३ प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

दरम्यानच्या काळात दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी मेट्रो-३ चे काम सुरू झाले आहे. सर्व ठिकाणी मोठय़ा संख्येने प्रखर दिवे लावले आहेत. या दिव्यांचा प्रकाश इमारतींवर पडतो व आकाशात फेकला जातो, त्यामुळे प्रकाश प्रदूषण होते, अशी देसाई यांची तक्रार होती. ई-मेलच्या माध्यमातून त्यांनी ही तक्रार मंगळवारी मेट्रोला पाठवली होती. बुधवारी मेट्रो -३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दखल घेणार असल्याचे उत्तर दिल्याची माहिती नीलेश देसाई यांनी दिली. तक्रारीमध्ये दिव्यांच्या वरच्या बाजूस छतासारखा छोटा भाग तयार करण्याचा सल्ला देसाई यांनी दिला आहे.

First Published on January 24, 2019 2:13 am

Web Title: notice of light pollution