News Flash

महाविद्यालयात समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्या!

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थेचा परिसर सुरक्षित असल्याचे जाहीर करूनच संस्थेने वर्गातील अध्यापन सुरू करायचे आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना

मुंबई : करोनाकाळात विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. यातून धडा घेऊन प्रत्येक शिक्षण संस्थेने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालये एकदम सर्वांसाठी खुली न करता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावीत असेही सांगितले आहे.

राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली असताना आता विद्यापीठ अनुदान आयोगानेही महाविद्यालये सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थेचा परिसर सुरक्षित असल्याचे जाहीर करूनच संस्थेने वर्गातील अध्यापन सुरू करायचे आहे. करोना कालावधीत अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागल्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी, घरातील व्यक्तीला किंवा विद्यार्थ्यांना करोनाची लागण, ऑनलाइन वर्गांत जुळवून घेण्यास अडचण, साधनांची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींमुळे विद्यार्थी तणावात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रत्येक संस्थेने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आयोगाने सांगितले आहे.

गर्दी नको!

एका वेळी ५० टक्केच विद्यार्थी उपस्थित असावेत अशी सूचना आयोगानेही दिली आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी किंवा शाखांसाठी एकदम महाविद्यालय सुरू न करता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावे. प्रात्यक्षिके असणाऱ्या विद्याशाखा, विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखा, त्यानंतर अंतिम वर्षाचे विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात यावे. नोकरी मेळाव्यांसाठी (कॅम्पस प्लेसमेंट) पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना वेळ ठरवून गटा गटाने बोलावण्यात यावे. शिक्षण संस्थांची वसतिगृहे अत्यावश्यक असल्यासच सुरू करावीत, असे आयोगाने सुचवले आहे. मोठे वर्ग न ठेवता त्याची विभागणी करून लहान वर्गखोल्या ठेवून मोजक्याच विद्यार्थ्यांना बोलावण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे.

‘अध्यापन कालावधी वाढवा’

जवळपास वर्षभर ऑनलाइन तासिका सुरू असल्या तरीही विद्यार्थ्यांना अनेक अडचणी, शंका असू शकतील. त्याचप्रमाणे एका वेळी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावता येणे शक्य नाही. अशा वेळी अध्यापनाचा दिवसभरातील कालावधी वाढवण्यात यावा. सहा दिवस अध्यापन असावे, असे आयोगाने परिपत्रात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 2:26 am

Web Title: notice of university grants commission akp 94
Next Stories
1 टाळेबंदीतही वाचनयात्रा अखंड सुरू
2 ‘देव सुद्धा मला पकडू शकत नाही’; खुलं आव्हान देणाऱ्या ‘खोपडी’ला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3 राखीव निधीतून कर्ज उभारणी
Just Now!
X