पालिकेच्या एस विभागातील मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी आरे परिसरातील १९ झाडे कापणे अथवा पुनर्रोपित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. यासंबंधीची नोटीस मंगळवारी संबंधित झाडांवर लावण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आरेमधील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे झाडांवर लावलेल्या नोटिशींबाबत उद्यान अधीक्षकांना पत्र लिहिणार असल्याचे आरे वाचवा चळवळीतील कार्यकर्ते जोरू यांनी सांगितले. ‘अशापद्धतीने आरेमधील झाडे कापणे अतिशय चुकीचे आहे. आरेतील ८०० एकर जागा जंगल घोषित केली असली तरीही यात नेमक्या कोणत्या जागेचा समावेश होतो हे स्पष्ट झालेले नाही’, अशी नाराजी कार्यकर्ते तबरेज यांनी व्यक्त केली.