करोना संसर्गामुळे मुंबईत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी रुग्णसेवा टाळून रुग्णालयांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावाव्यात, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पालिका प्रशासनाला दिले.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील अधिष्ठात्यांची भायखळा येथील जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन कक्षातील सभागृहात मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी रुग्णालयांतील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले उपस्थित होते. करोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णालयांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी रुग्णालयांतील काही डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहात असल्याचे निदर्शनास आले . अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावावी, असे आदेश पेडणेकर यांनी यावेळी दिले.