वृद्ध आई-वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करून बेस्टच्या वसाहतींमध्ये जागा मिळविणाऱ्या २७० कर्मचाऱ्यांना घर सोडण्याची नोटीस प्रशासनाने पाठविली आहे.
बेस्ट उपक्रमाने परळ, दिंडोशी, गोरेगाव, देवनार, अमृतनगर, पंतनगर, घाटकोपर येथे अधिकाऱ्यांसाठी ५५, तर कर्मचाऱ्यांसाठी १२३ वसाहती बांधल्या आहेत. आई-वडील आजारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी बेस्टच्या वसाहतीमध्ये घर उपलब्ध केले जाते. हे कारण पुढे करून अनेक कर्मचाऱ्यांनी बेस्ट वसाहतीमध्ये घरे मिळविली आहेत. मात्र घर मिळाल्यानंतर हे कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये अथवा गावी पाठवत असल्याचे आढळून आले आहे. तसेच घर मिळविण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचेही निदर्शनास आले आहे.
या संदर्भात बेस्ट उपक्रमाच्या दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत तब्बल २७० कर्मचाऱ्यांनी आई-वडिलांच्या आजारपणाची बनावट कागदपत्रे सादर करून घर मिळविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना घर रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.