प्रसाद रावकर

असमाधानकारक उत्तर देणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला

गेले वर्षभर प्रबोधन करूनही दोन इमारतींमधील घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या दक्षिण मुंबईमधील तब्बल ५०० कुटुंबीयांवर पालिकेने नोटीस बजावली आहे. नोटीसला समाधानकारक उत्तर न देणाऱ्या कुटुंबांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यामुळे या कुटुंबांचे धाबे दणाणले आहे.

दक्षिण मुंबईमधील पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील रहमान स्ट्रीट, मौलाना शौकत अली रोड, पाचवा कुंभारवाडा, नानुभाई देसाई रोड, सी. पी. टँक, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड., ए. के. रोड, आनंदीलाल पोदार मार्ग या परिसरात मोठय़ा संख्येने दाटीवाटीने इमारती उभ्या आहेत. दोन इमारतींमध्ये जेमतेम अर्धा ते एक फूट रुंद अशा एकूण १७१७ घरगल्ल्या आहेत. या इमारतींमधील रहिवासी या घरगल्ल्यांमध्ये सर्रास कचरा फेकत असून घरगल्ल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. घरात नको असलेला कचरा, उष्टे खरकटे घरगल्ल्यांमध्ये टाकण्यात येत असल्यामुळे या परिसरात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे.

दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींदरम्यानच्या घरगल्ल्यांमधूनच गेलेल्या जलवाहिन्यांद्वारे रहिवाशांना पाणीपुरवठा होत आहे. न्हाणीघर, सांडपाण्याच्या फुटलेल्या वाहिन्यांमधून घरगल्ल्यांमध्ये गळती होत असून काही ठिकाणी सांडपाणी आणि कचरा यामुळे घरगल्ल्यांना बकाल रूप आले आहे. घरगल्ल्यांमधून गंजून रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.

घरगल्ल्या स्वच्छ राहाव्यात यासाठी ‘सी’ विभाग कार्यालयाने २ ऑक्टोबर २०१७ पासून या परिसरात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली. मात्र एक वर्ष लोटल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल आढळून आला नाही. त्यामुळे आता ‘सी’ विभाग कार्यालयाने धोबीतलाव, भुलेश्वर, घोगारी मोहल्ला, खारा टँक, कुंभारवाडा या भागातील घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या तब्बल ५०० कुटुंबांवर नोटीस बजावली आहे.

कचरा करणाऱ्यांवर प्रति दिन एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद पालिकेच्या नियमात आहे. मात्र दंडाची आकारणी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांशी रहिवासी हुज्जत घालत असून वेळप्रसंगी प्रकरण हातघाईवर आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येत आहे. ही बाब लक्षात घेऊन घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

काही भागात सकाळी १० ते ११ च्या दरम्यान कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरत असते. मात्र रहिवासी घंटागाडीमध्ये कचरा टाकण्याऐवजी घरगल्ल्यांमध्ये टाकत आहेत. तसेच काही दुकानदारही रस्त्यावरच कचरा टाकत असून त्यांच्यावरही नोटीस बजावून न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

दोन इमारतींमधील अरुंद घरगल्ल्या स्वच्छ करणे अवघड बाब आहे. गल्ल्यांमध्ये कचरा टाकला नाही, तर त्या स्वच्छ राहतील. मात्र तसे होत नसल्यामुळे कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

– सुनील सरदार, साहाय्यक आयुक्त, ‘सी’ विभाग कार्यालय