मालाडच्या पिंपरीपाडा येथे पालिकेच्या जलाशयाभोवती संरक्षक भिंत बांधणाऱ्या कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नोटीस धाडली आहे. ही भिंत पडून सोमवारी रात्री भीषण दुर्घटना घडली त्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण ११४ लोक जखमी झाले होते. ही भिंत सन २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. तीनच वर्षांत ही भिंत पडल्यामुळे या भिंतीच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मालाडमध्ये पिंपरीपाडा येथे असलेल्या पालिकेच्या जलाशयाभोवतालची दगडी भिंत जुनी झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पालिकेने २०१७ मध्ये नवीन भिंत बांधून घेतली. सन २०१५ मध्ये या भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते व २०१७ मध्ये हे काम पूर्ण झाले. वनविभाग आणि पालिकेच्या जमिनीची हद्द ठरवण्यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत १५ फूट उंच आणि अडीचशे फूट लांब होती. या भिंतीचा हमी कालावधी तीन वर्षांचा असतानाही भिंत पडल्यामुळे बांधकामाबाबत संशय निर्माण झाला होता. तसेच ही भिंत बरोबर बांधली नसल्याचे स्थानिकांचेही म्हणणे आहे. भिंतीच्या पलीकडे डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कंत्राटदाराने ठेवलेली भोके लहान असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. कंत्राटदाराला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

दरम्यान, पालिकेच्या पी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी या विभागातील नगरसेवक आणि स्थानिकांसह पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या भिंतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित पालिका अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच या भिंतीच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रिया, बांधकामाचा दर्जा तसेच वनविभागाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणाचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

चौकशी समिती स्थापन

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासनाने मुख्य जलअभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये व्हीजेटीआय आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला असून ही समिती १५ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.