महापालिकेकडून नोटिसा; राज्य पशू कल्याण मंडळाचा परवाना बंधनकारक

अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानदारांना पालिकेने नोटिसा धाडण्यास सुरुवात केली आहे. या दुकानदारांना महाराष्ट्र पशू कल्याण मंडळाचा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. या परवान्यासाठी सुरू असणाऱ्या दुकानांवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.

विविध प्रकारचे पक्षी, कुत्र्यांची पिल्ले, मांजरी, कासवे असे प्राणी विकणाऱ्या दुकानदारांविरोधात राज्य सरकारच्या पशुकल्याण विभागाने कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील अशा दुकानांना पालिकेमार्फत सध्या नोटिसा धाडण्यात येत आहेत. मुंबईत साधारणत: दोन हजारांच्या वर प्राणी विकणारी दुकाने आहेत. या दुकानांना पालिकेमार्फत गुमास्ता परवाना दिला जात होता. मात्र या दुकानांमध्ये पाळीव प्राण्यांचा अतोनात छळ केल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु त्यावर कोणाचाही वचक नव्हता. त्यामुळे प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याअंतर्गत अशा दुकानांना राज्य पशुकल्याण मंडळाचा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने पाठवलेल्या नोटिसांमार्फत हा परवाना घेण्याबाबत दुकानदारांना सूचित करण्यात आले आहे.

दुकानदारांनी पशुकल्याण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या दुकानांची तपासणी करतील. दुकानात विकले जाणारे प्राणी आणि त्यांना दिली जाणारी वागणूक योग्य असेल तसेच सगळे नियम पाळले जात असतील तर अशा दुकानांना परवाना दिला जाणार आहे. मात्र एखाद्या दुकानात गैरप्रकार आढळल्यास जिल्हा प्राणी क्लेश समितीमार्फत प्राणी जप्त करून दुकानदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्राणी क्लेश समितीची स्थापना

राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेपासून बचाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्राणी क्लेश समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाळीव प्राण्यांची दुकाने असून त्यांना सर्वप्रथम नोटिसा देण्यात आल्या आहेत.

‘गैरप्रकारांना आळा’

विक्रीसाठी दुकानांमध्ये आणण्यात येणाऱ्या प्राणी-पक्ष्यांची तस्करी, अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येणारे त्यांचे प्रजनन, योग्य प्रशिक्षणाविना त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार अशा बाबी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांना जन्मल्यानंतर लगेचच त्यांच्या आईपासून दूर करण्यात येते आणि नंतर त्यांना धुंदीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात डांबून ठेवण्यात येते. छोटय़ाशा पिंजऱ्यात एकाच वेळी अनेक पक्ष्यांना कोंडून ठेवणे, एवढेच नव्हे, तर गरम चाकूने त्यांची चोच कापणे, जे प्राणी-पक्षी विकण्याची परवानगी नाही ते विकणे, प्राण्यांना अस्वच्छ जागी ठेवणे, त्यामुळे रोगराई पसरणे अशा गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.