डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर सर्वच धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या असल्या तरी पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच असल्याने संबंधित नागरिकांनी नगरसेवक, अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मात्र डॉकयार्ड इमारतीनंतर धोकादायक इमारतींची जबाबदारी घेण्यास पालिका अधिकारी तयार नाहीत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, पलटण रस्त्यावरील शिवाजी मंडईतील कार्यालये सात दिवसात रिकामी करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. मात्र या मंडईपासून दूरच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे ठरल्याने व्यापाऱ्यांनी विशेषत मच्छिमारांनी जागा रिकाम्या करण्यास विरोध केला. महात्मा फुले मंडईत जागा मिळावी, अशी मागणी घेऊन व्यापारी पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांना भेटले. महात्मा फुले मंडईत काही गाळे शिल्लक आहेत. मात्र माशांचा  वास असल्याने मच्छीमार्केटचे तेथे पुनर्वसन करण्यास स्थानिक व्यापाऱ्यांचा सुप्त विरोध आहे. त्यामुळे पुनर्वसन केल्याशिवाय हटवू नये, अशी मागणी मच्छीमारांनी केली. मात्र त्यांच्या पुनर्वसनाबाबत निश्चित योजना पालिकेकडे नाही.
दादर येथील गौतमनगर परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांची एक क्रमांकाची इमारत खाली करण्यासाठीही पालिकेने नोटीस बजावली. इमारत खाली करण्यास तयार नसलेल्या ४५ कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. यापूर्वी दोन क्रमांकाची धोकादायक ठरलेली इमारत खाली करण्यासाठी त्या इमारतीमधील ६० कर्मचाऱ्यांना ७२ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. एक क्रमांकाची इमारत २००९ मध्ये धोकादायक ठरवण्यात आली होती. मात्र तेव्हापासून पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र डॉकयार्ड इमारतीची दुर्घटना घडल्यावर कोणतेही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही.
इमारतीमधील रहिवाशांना माहूल भागात घरे देण्याची तयारी पालिकेने केली आहे. मात्र दादर रेल्वे स्थानकाजवळ असलेली घरे सोडून दूर जाण्यासाठी रहिवासी तयार नाहीत. ही इमारत ४० वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यानंतर पालिकेने एकदाही या इमारतीची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे ती धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. या इमारतीसमोर त्याच काळात बांधलेली १२ मजल्यांची इमारत आजही उत्तम स्थितीत आहे. पालिकेच्या अयोग्य कारभाराचा फटका रहिवाशांना बसत आहे, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. मूळ जागी बांधलेल्या नवीन इमारतीत कर्मचाऱ्यांना घरे देण्याचे आश्वासन पालिका प्रशासन देत आहे, मात्र या इमारती तयार होण्यासाठी किती काळ जाईल, याची कल्पना नसल्याने रहिवासी धास्तावले आहेत, असे नायगावमधील आमदार कालीदास कोळंबकर म्हणाले.