जुलैपासून लहान मुलांवर चाचण्यांची सीरमची तयारी

अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेली लस सप्टेंबरपासून भारतात उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूटने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. भारतात ही लस कोव्हाव्हॅक्स नावाने ओळखली जाईल.

सीरमने लसनिर्मितीबाबत नोव्हाव्हॅक्स कंपनीशी करार केला आहे. भारतात कोव्हाव्हॅक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्यां या लशीच्या लहान मुलांवरील चाचण्या जुलैपासून सुरू करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ही लस ९०.४ टक्के परिणामकारक असल्याचे लशीच्या तिसऱ्यां टप्प्यातील चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. या लशीची परिणामकारकता, सुरक्षा आणि रोगप्रतिकारकशक्ती यांचे मूल्यांकन करण्यासाठी अमेरिका आणि मेक्सिकोतील ११९ शहरांमधील २९ हजार ९६० जणांना चाचणीत सहभागी करून घेण्यात आले होते. या लशीच्या परिणामकारकतेची आकडेवारी प्रोत्साहित करणारी असून, त्याच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून ही लस सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक असल्याचे सूचित होत आहे, असे नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.

राज्यात रुग्णघट कायम

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ९८३० नव्या रुग्णांची नोंद झाली तर २३६ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ५८९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत मुंबई ६६६, रायगड ५५३, नाशिक जिल्हा १५०, पुणे जिल्हा ५९७, पुणे शहर ३५७, पिंपरी-चिंचवड १८९, कोल्हापूर जिल्हा १००२, सातारा ७७९, सांगली ७२६, रत्नागिरी ५३९, सिंधुदुर्ग ४८३ नवे रुग्ण आढळले.

देशात करोनाचे  ६७ हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ६७ हजार २०८ रुग्ण आढळले. दिवसभरात २३३० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या तीन लाख ८१ हजार ९०३ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आठ लाख २६ हजार ७४० वर आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.