निलोफर वादळामुळे ऑक्टोबर हीटमध्ये मिळालेला तात्पुरता दिलासा आता निघून गेला असून मुंबई पुन्हा एकदा तापू लागली आहे. शनिवारी, रविवारी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून पुढील तीन दिवस तरी तापमान ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.
ऑक्टोबर हीटमुळे गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात तापमानाने दहा वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक करत ३७.४ अंश से.पर्यंत मजल मारली होती. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेले निलोफर वादळ व त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर आलेले ढग यामुळे शहरातील तापमान ३० अंशांहून खाली घसरले होते. चार ते पाच दिवस हा गारवा अनुभवायला मिळाला. मात्र निलोफर वादळ ३१ ऑक्टोबर रोजी शमले व उन्हाचे चटकेही मुंबईकरांना जाणवू लागले. शनिवारी सांताक्रूझ येथील पारा ३६.५ अंश से. पर्यंत चढला होता. रविवारी त्यात एक अंशाची घसरण झाली. मात्र सोमवारी तापमान पुन्हा ३६ अंश से. पर्यंत जाऊ शकेल, असा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंडीची लाट पसरली आणि तेव्हा वाऱ्यांची दिशा उत्तर-दक्षिण असली तर मुंबईत काही प्रमाणात गारवा येतो. मात्र दरवर्षी साधारण नोव्हेंबर अखेरीस ही स्थिती निर्माण होते. गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबरमधील तापमानाचा आढावा घेतल्यास या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झालेली दिसते. त्यामुळे ऑक्टोबर संपला असला तरी उन्हाचा ताप आणखी काही दिवस सहन करावा लागण्याची शक्यता आहे.