रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत ताटकळत राहण्यापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण रेल्वे मंत्रालय एक नवीन संकल्पना राबवणार असून, त्यामुळे प्रवाशांना मोबाइलवरच थेट तिकीट काढता येणार आहे. तिकीट काढण्यासाठी एक नवीन अ‍ॅप बनविण्यात आला असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २६ डिसेंबर रोजी या अ‍ॅपचे लोकार्पण होणार आहे. मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपनगरीय आणि अनारक्षित तिकिटे मोबाइलवर उपलब्ध होणार असल्याची घोषणा रेल्वे बोर्डाचे सदस्य देवीप्रसाद पांडे यांनी नुकतीच मुंबई भेटीदरम्यान केली होती. मोबाइलवर तिकीट काढण्यासाठी एक नवे अ‍ॅप विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा होणार असून, त्यानंतर मुंबईतील दहा निवडक आणि महत्त्वाच्या स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांमध्ये मोबाइल तिकिटे छापण्याची सोय केली जाईल. यात पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील पाच-पाच स्थानकांचा समावेश आहे. त्यात दादर, अंधेरी, ठाणे, घाटकोपर या स्थानकांचा समावेश असेल.
पैसे कसे?
तिकिटांचे पैसे भरण्यासाठी रेल्वेने ‘आर वॉलेट’ ही संकल्पना आणली आहे. या ‘वॉलेट’मध्ये पैसे भरण्यासाठी ‘ऑनलाइन’, ‘तिकीट खिडकीवर पैसे देऊन’ असे पर्याय उपलब्ध आहेत. मोबाइलवर तिकीट काढल्यानंतर तिकिटांची रक्कम वजा होऊन ‘वॉलेट’मध्ये उरलेली रक्कम पाहता येईल.
* या अ‍ॅपद्वारे तिकीट काढून रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम यंत्रांद्वारे ते छापून घेता येईल.
* त्यासाठी त्या अ‍ॅपवर तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल.
* तिकीट काढल्यानंतर मोबाइलवर एक संदेश येईल. या संदेशात एक, चार किंवा सहा अंकी पिन पाठवण्यात येईल.
* एटीव्हीएम यंत्रात स्मार्टकार्डच्या बरोबरीनेच मोबाइलचाही पर्याय दिला जाईल. त्या पर्यायावर गेल्यानंतर मोबाइल क्रमांक आणि संदेशाद्वारे आलेला पिन क्रमांक टाकून छापील तिकीट घेता येणार आहे.