News Flash

अजितदादा बदलले ..

आक्रमक, कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही, जे असेल ते तोंडावर बोलायचे हा अजित पवार यांचा स्वभाव. कोण काय बोलेल यापेक्षा आपल्या मतावर ठाम. साहेबांचे (शरद पवार)

| March 13, 2015 04:01 am

अजितदादा बदलले ..

आक्रमक, कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही, जे असेल ते तोंडावर बोलायचे हा अजित पवार यांचा स्वभाव. कोण काय बोलेल यापेक्षा आपल्या मतावर ठाम. साहेबांचे (शरद पवार) हे आपल्याला पटत नाही हे बिनधास्त सांगण्यास ते कचरत नाहीत. सत्ता गेल्यावर नेतेमंडळींच्या आचरणात बदल होतो, असे म्हणतात. ते अजितदादांबाबत लागू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी विधानसभेत अजितदादा गुरुवारी वेगळ्याच भूमिकेत गेल्याचे बघायला मिळाले. शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही अलीकडच्या काळातील पहिल्या फळीतील नेतेमंडळी सभागृहात बोलताना एखाद्याची अशी काही टोपी उडवायचे की समोरचा पार गोंधळून जायचा. एरवी कायम सत्तेतच असल्याने सभागृहात उत्तर देताना अजितदादा मोजकेच बोलत. विरोधात बसल्यावर अजितदादांमध्ये काहीसा बदल होऊ लागल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेण्यासाठी अजितदादा पूर्ण तयारीनिशी आले होते. मंत्र्यांप्रमाणेच सारे मुद्दे त्यांनी तयार केले होते. नव्या सरकारने उत्साह आणि जोमाने कामाला सुरुवात केली, या राज्यपालांच्या अभिभाषणातील भाषणाचा धागा पकडत हे सरकार सर्व आघाडय़ांवर अयशस्वी ठरले असताना उत्साह आणि जोम कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही हे सांगताना त्यांनी या संदर्भातील दाखलेही दिले. शिवसेनेशी तुमचे जमत नसले तरी मुख्यमंत्र्यांशी जुळवून घ्या, असा सल्ला दिला. कारण शिवसेनेने पाठिंबा काढल्यास घरी जावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांना उद्देशून अजितदादा बोलले तेव्हा राष्ट्रवादी तयारच आहे हे सांगण्याची काँग्रेसच्या सदस्यांनी संधी मात्र सोडली. भाजप आणि शिवसेनेतील अंतर वाढविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्दय़ात हात घालून भाजप याबाबत फार काही गंभीर दिसत नाही, असे सांगत भाजपला टोचले. जैतापूरवरूनही शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली तरी माघार घेऊ नका, असा सल्ला अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांच्या टोप्या उडविण्याचे कसब अजून अजितदादांमध्ये आले नसले तरी चिमटे काढण्याची सुरुवात तरी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 4:01 am

Web Title: now ajit pawar changed
Next Stories
1 नवी मुंबईतील २० हजार घरे अधिकृत
2 पूलाचा भाग कोसळला
3 बेकायदा फलक प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश
Just Now!
X