उपनगरीय आणि लांबपल्ल्याच्या अनारक्षित तिकिटांच्या विक्रीदरम्यान गैरव्यवहार टाळण्यासाठी रेल्वेच्या तिकिटाला लवकरच ‘बारकोड’ची जोड मिळणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून तिकिटांतील गैरप्रकार टाळता येणार आहे. दिल्ली येथे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेली ही सेवा किमान वर्षअखेरीस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे समजते.

सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात दर दिवशी तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या ६० टक्के, एटीव्हीएमवरून २३ टक्के आणि जेटीबीएसवरून १७ टक्के आहे. याशिवाय सुट्टय़ांच्या लांबपल्ल्याच्या अनारक्षित तिकिटांच्या आधारे प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र त्यावेळी तिकीट अस्सल आहे किंवा नाही हे तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेकदा तिकिटाची रंगीत प्रतिमुद्रा (झेरॉक्स) काढून स्कॅनिंगच्या माध्यमातून तिकिटांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. याच धर्तीवर रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदाच तिकिटांसाठी बारकोडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.

१ मार्चला दिल्लीतील काही भागात या प्रकारे अनारक्षित तिकिटांवर बारकोडची जोड देण्यात आली आहे. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या प्रयोगानंतर त्यातील त्रुटी लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रणालीत बदल केले जाणार आहेत. त्यानंतर मुंबईतील उपनगरातील काही स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ही प्रणाली राबविण्यात येणार असून यासाठी काही कालावधी जाणार असल्याचे रेल्वे माहिती प्रणाली केंद्राचे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले.

बारकोड प्रणालीविषयी

रेल्वेच्या तिकिटाची सत्यता तपासण्यासाठी बारकोडची जोड असणार आहे. यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तिकीट तपासणीस प्रवाशांकडे असणारे तिकीट स्कॅन करू शकणार आहे. स्कॅनिंगच्या माध्यमातून तिकिटाची वेळ, तारीख आणि स्थानक आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई शक्य होणार असल्याचे समजते.