रेल्वेच्या प्रवासी भाडय़ामध्ये सहा महिन्यांपूर्वी मोठी वाढ झाल्यानंतर आता पाठोपाठ तिकीट रद्द करण्यासाठीही पूर्वीपेक्षा खूप अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे. तसेच तुम्ही कोणत्या वर्गाने प्रवास करणार होतात त्यानुसार तिकीट रद्द करताना ठरावीक रक्कम यापुढे कापून घेतली जाणार आहे.
आजवर प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळेआधी २४ तासपर्यंत तिकीट रद्द केल्यास पूर्ण पैसे परत मिळत असत. मात्र आता प्रवासाच्या वेळेच्या ४८ तास आधी आरक्षण रद्द केल्यासच जास्तीत जास्त रक्कम परत मिळू शकणार आहे. यापुढे रद्द करण्यात येणाऱ्या तिकिटांच्या रकमेतून प्रतिप्रवासी ठरावीक रक्कम थेट कापून घेतली जाणार आहे.
प्रवाशांनी ४८ ते सहा तास या दरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकिटाच्या २५ टक्के रक्कम अधिक वरील रक्कम कापली जाणार आहे. ही मर्यादा आधी २४ ते चार तास अशी होती. तर प्रवासाच्या सहा ते दोन तास आधी तिकीट रद्द करण्यात आल्यास ५० टक्के रक्कम कापून घेतली जाईल. गाडी निघून गेल्यानंतर दोन तास अथवा त्यानंतर तिकीट रद्द केल्यास यापुढे काहीच पैसे मिळणार नाहीत. तसेच संपूर्ण कुटुंबाने किंवा एखाद्या ग्रूपने आरक्षण केले असेल आणि त्यांच्यापैकी काहीच जणांचे आरक्षण नक्की झाले असेल, तर अशा वेळी प्रवासाच्या सहा तास आधी किंवा गाडी सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास त्यांना जास्तीत जास्त रक्कम परत मिळेल.
वेटिंग आणि रिझव्‍‌र्हेशन अगेस्ट कॅन्सलेशन (आरएसी) या दोन प्रकारांमध्ये काही नाममात्र शुल्क कापून रक्कम परत केली जाईल. मात्र त्यासाठी तीन तास आधी तिकीट रद्द करणे आवश्यक आहे.

सुधारीत ‘कपात’ दर
* वातानुकूलित प्रथम श्रेणी -प्रति व्यक्ती १२० रुपये
* वातानुकूलित टू टायर – प्रति व्यक्ती १०० रुपये
* वातानुकूलित थ्री टायर चेअरकार- प्रति व्यक्ती ९० रुपये
* शयनयान श्रेणी – प्रति व्यक्ती ६० रु.
* द्वितीय श्रेणी –  प्रति व्यक्ती ३० रुपये