मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचा उपक्रम
नोकरी, मूल दत्तक घेणे, मूत्रपिंड दान आदींसाठी आवश्यक असलेले चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यास मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने सुरुवात केली आहे. याबाबत आवश्यक ते सॉफ्टवेअर तयार केले जात असून त्यानंतर विशेष शाखेच्या कार्यालयात न येता चारित्र्य प्रमाणपत्र कमी कालावधीत उपलब्ध होणार आहे.
नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक असते. याशिवाय अनेक बाबींसाठी विशेषत: परदेशातूनही चारित्र्य प्रमाणपत्र मागविले जाते. शंभर रुपये भरून हे प्रमाणपत्र मुंबई पोलिसांकडून जारी केले जात असले तरी त्यासाठी अर्जदाराला अनेक दिव्यातून जावे लागते. बऱ्याच वेळा विहित कालावधीत हे प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांना निराश व्हावे लागते. काही जणांना नोकरीही गमावण्याची पाळी आली आहे. मात्र त्यामुळे काही प्रमाणात भ्रष्टाचारालाही वाव मिळाला होता. हे टाळण्यासाठी विशेष शाखेचे नवे उपायुक्त अंकुश शिंदे यांनी कार्यालयात खेटे न घालता संबंधितांना चारित्र्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.
नव्या पद्धतीनुसार अर्जदाराला ऑनलाइन चारित्र्य प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर त्याला लगेचच त्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत तारीख दिली जाईल. त्यानुसार त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्याला ऑनलाइन हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला अंतिम स्वरूप दिले जात आहे, असे उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. पोलीस ठाण्याकडून अर्ज आल्यानंतर व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे त्याने दिलेल्या माहितीची शहानिशा केली जाणार आहे. त्यात काहीही अडचण नसल्यास लगेचच संबंधित अर्जदाराला चारित्र्य प्रमाणपत्र उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिन्याभराच्या कालावधीत चारित्र्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, परंतु काही वेळा तीन-तीन महिनेही हे प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. सदर प्रमाणपत्राबाबतचा अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला असला तरी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित अर्जदाराला विशेष शाखेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता अर्जदाराला फक्त एकदाच स्थानिक पोलीस ठाण्यात जावे लागेल. कमी वेळात त्याला चारित्र्य प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकेल
– अंकुश शिंदे, उपायुक्त, विशेष शाखा