News Flash

आता शाळांना सुट्टी १ मेपासून..

शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे. 

शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक

परीक्षा संपल्या की मामाच्या किंवा बाबांच्या गावाला जाण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आणि बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात यंदापासून बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी  सुरू राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असे. यंदापासून मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.  पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.

निकालाचे काम कधी करायचे?

मार्चमध्ये मुलांना सुट्टी दिली की शाळांमध्ये निकाल, वार्षिक कागदपत्रांची पूर्तता अशी कामे सुरू होतात. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका सुरू होतात. आता मुले शाळेत येणार असतील तर हे काम कधी करायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

काय होणार ?

शाळांमधील पहिली ते नववीचे वर्ग १ मेपर्यंत सुरू राहतील. या कालावधीत उन्हाळी शिबीर आणि इतर उपक्रम राबविले जातील. वर्गातील उपस्थिती विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.

शिक्षकांवर पॅडमॅनप्रचाराची जबाबदारी

अभियान राबवा, अहवाल पाठवा या शिक्षण विभागाच्या मोहिमेबरोबर ग्रामविकास विभागाने ‘चित्रपट दाखवा, अहवाल पाठवा’ अशी मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. शाळांमधून ‘पॅडमॅन’ चित्रपट तातडीने दाखवून त्याचा अहवाल पाठवण्याची सूचना शिक्षकांना देण्यात आली आहे. पॅडमॅन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ग्रामविकास विभागाने  सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत अस्मिता योजनेद्वारे जागृती सुरू केली. त्याचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना दोन दिवसात पॅडमॅन चित्रपट दाखवण्यात यावा, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीती पसरली आहे.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचा हा निर्णय दुर्दैवी असून महाराष्ट्रातील वाढते तापमान लक्षात घेता मुलांना शाळेत बोलावणे हा शिक्षा करण्यासारखाच प्रकार आहे. शिक्षक १ मे पर्यंत शाळेत असतात पण विद्यार्थी व पालकांना ही सक्ती का? दहावीचे जादा वर्ग चालू असतातच, पण बाकीच्या लहान मुलांना शिक्षा का? ही योजना ऐच्छिक हवी होती.

प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 4:57 am

Web Title: now holiday for schools from 1st may
Next Stories
1 ‘तरुण तेजांकित’ सोहळ्यास पोहनकर पिता-पुत्राची स्वरसाथ
2 सत्ताधाऱ्यांकडूनच मुंबई पालिका, सिडकोच्या कारभाराचे वाभाडे
3 म्हाडातील १६०० कोटींच्या भूखंड घोटाळ्याबाबत उत्तर द्या
Just Now!
X