मुंबई-अलिबाग, काशीद, मुरुड जंजिरा या भागात जाणाऱ्या लाखो प्रवाशांची पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून लवकरच सुटका होणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा तसेच नेरुळ या दरम्यान जलप्रवास सेवेच्या माध्यमातून पावसाळ्यातही प्रवासी जल वाहतूक लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी समुद्राच्या पाण्याचा प्रवाह व लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी मांडवा बंदरात ७२.१४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या लाटरोधक बंधाऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. परिणामी पुढील दीड ते दोन वर्षांत ही जलवाहतूक प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

गेट वे ऑफ इंडिया आणि मांडवा येथे सध्या वर्षांतील आठ महिने जलमार्गाने प्रवासी वाहतूक सुरू असून वर्षांला सुमारे १० लाख प्रवासी मुंबई ते अलिबाग असा प्रवास करतात.
मुंबई, ठाणे भागातून अलिबाग, मुरुड जंजिरा या ठिकाणी रस्त्याने जाण्यासाठी पर्यटकांना सुमारे १०० ते १५० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. त्यासाठी जवळपास तीन ते चार तासांचा वेळ लागतो. याउलट जलमार्गाने मात्र अलिबागला त्वरित पोहोचता येते. त्यामुळे मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा विकास करताना रो-रो सुविधा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून ही जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) सोपविण्यात आली होती. मात्र निधीअभावी त्यांना हे काम करता आले नाही. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानुसार मांडवा येथे लाटरोधक बंधारा बांधल्यास तेथील समुद्राच्या पाण्याचा प्रवाह आणि लाटांची तीव्रता कमी होऊन आतील बाजूस कायम संथ पाणी राहण्यास मदत होईल. त्यामुळे या मार्गावर बारमाही प्रवाशी वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यासाठी मांडवा येथे ६३ कोटी खर्चून आगमन धक्का, टर्निग प्लॅटफॉर्म तसेच ७२ कोटी रुपये खर्चून ३६० मीटर लांबीची लोट रोधक िभत बांधण्यात येणार आहे. नेरुळ येथेही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

प्रत्यक्षात कधी येणार?
१९९५ मध्ये युतीचे सरकार असताना जलवाहतुकीला चालना देण्यात आली होती. पण विविध परवानग्यांमुळे मुंबई व परिसरातील जलवाहतुकीला मुहूर्त मिळू शकलेला नाही. भाजप सरकारने आता पुढाकार घेतला असला तरी साऱ्या परवानग्या प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याची काहीही खात्री देता येत नाही.