News Flash

.. आता लाईन ‘वूमनिया!’

विजेच्या खांबांवर चढून वा रोहित्रांच्या आणि तारांच्या जंजाळात शिरून काम करत राज्यातील वीजयंत्रणा प्रवाही ठेवण्यासाठी तब्बल १५५३ महिला ‘महावितरण’च्या सेवेत विद्युत सहाय्यक म्हणून रुजू होत

| July 7, 2013 02:21 am

विजेच्या खांबांवर चढून वा रोहित्रांच्या आणि तारांच्या जंजाळात शिरून काम करत राज्यातील वीजयंत्रणा प्रवाही ठेवण्यासाठी तब्बल १५५३ महिला ‘महावितरण’च्या सेवेत विद्युत सहाय्यक म्हणून रुजू होत आहेत.
विद्युत सहाय्यकांना (लाइनमन) विजेच्या खांबावर चढून वाहिन्यांची दुरुस्ती करणे, वीजयंत्रणा बिघडल्यास तारांच्या जंजाळात शिरणे, रोहित्रांची दुरुस्ती करणे, नवीन वीज जोडण्या देणे अशी जिकिरीची आणि प्रसंगी जोखमीची कामे करावी लागतात. गेल्या काही काळात ‘महापारेषण’ने सर्वप्रथम या कामांसाठी महिलांची नियुक्ती केली. ते पाहून ‘महावितरण’नेही काही नियुक्त्या केल्या. पण आता राज्यातील ६९७४ विद्युत सहाय्यक पदांच्या भरतीच्या निमित्ताने महिलांनी मोठय़ा संख्येने त्यात सहभागी होत पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील माधुरी गणवीर या २९ वर्षीय मुलीची निवड पुणे परिमंडळात झाली आहे. ‘या पदाचे आव्हान महिला यशस्वीरित्या पेलतील याचा तिला विश्वास आहे. हे पद तांत्रिक असल्याने प्रसंगी विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करावी लागेल याची कल्पना होतीच. आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. त्यामुळे आजवर असे काम केले नसले तरी प्रशिक्षणानंतर हे कामही आम्ही नक्कीच चांगल्यारितीने करू शकू,’ असे तिने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.  
वध्र्याच्या तेजस्विनी सरपाम हिची निवड नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या गडचिरोलीतील अलापल्ली येथे झाली आहे. ‘नक्षलवादी जिल्हा-जोखमीचे काम म्हणून भीती ही वाटतेच, पण काम करायचे तर त्यावर मातही करावी लागेल. शिवाय प्रशिक्षण मिळणार असल्याने त्यानंतर फारशी अडचण येईल असे वाटत नाही,’ असे तेजस्विनीने सांगितले.
रीतसर प्रशिक्षण : विजेच्या खांबावर कसे चढावे, तेथे दुरुस्ती करताना काय खबरदारी घ्यावी, वीजयंत्रणेतील वेगवेगळय़ा प्रकारच्या बिघाडांना कसे तोंड द्यावे अशा सर्व गोष्टींचे प्रशिक्षण नाशिक, अमरावती आणि सांगली या तीन ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर खाकी शर्ट-पँट, बूट, बेल्ट आणि डोक्यावर नेट अशा पेहरावातील महिला राज्यातील वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत होतील. पहिल्या वर्षी सहा हजार रुपये, दुसऱ्या वर्षी सात हजार आणि तिसऱ्या वर्षी आठ हजार रुपये दरमहा असा मोबदला त्यांना मिळेल. नंतर कायम झाल्यावर दरमहा सुमारे १५ हजार रुपये इतके वेतन त्यांना मिळणे सुरू होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 2:21 am

Web Title: now line womaniya mahavitaran set to fill 1500 post of women electric associates
टॅग : Mahavitaran
Next Stories
1 काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रण!
2 केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाही आरोपी करण्याची मागणी
3 कुपोषणाचे उत्तर शोधण्यासाठी ३८ वर्षांनंतर समिती
Just Now!
X