संदीप आचार्य- निशांत सरवणकर

घराच्या प्रतीक्षेत असलेल्या दीड लाख गिरणी कामगारांपैकी फक्त १२ हजार कामगारांसाठी घरे उपलब्ध झाली असून, भविष्यात आणखी केवळ साडेचार हजार घरे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय म्हाडाचा वाटा निश्चित न झालेल्या ११ गिरण्यांच्या भूखंडावर उभ्या राहणाऱ्या दोन ते तीन हजार घरांचा विचार केल्यास भविष्यात सुमारे सव्वा लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळण्याची आशा धूसर झाली आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गिरणी कामगारांच्या संघर्ष समितीने पुन्हा एकदा घरांसाठी आंदोलन सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार अशा एक लाख ४८ हजार ८६७ पैकी जेमतेम २० हजारांच्या आसपास गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना आता यापुढे मुंबईत घर मिळू शकणार आहे. उर्वरित गिरणी कामगार वा त्यांच्या वारसदारांसाठी भाजप सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. आता महाविकास आघाडी काही तरी निर्णय घेईल, या आशेवर हे गिरणी कामगार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादर झालेल्या अहवालानुसार, म्हाडाला आतापर्यंत ३३ गिरण्यांचे भूखंड प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८ गिरण्यांच्या भूखंडावर १०,१६५ सदनिका बांधून त्यांचे वितरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सहा गिरण्यांच्या भूखंडावर ३,९३० सदनिका बांधण्यात आल्या तर तिसऱ्या टप्प्यात तीन गिरण्यांच्या भूखंडावर ५,७१० सदनिकांचे काम सुरू आहे. आणखी सात गिरण्यांच्या भूखंडांवर लवकरच सदनिका बांधल्या जातील. म्हाडाचा वाटा निश्चित न झालेल्या ११ गिरण्या, तर म्हाडाचा वाटा निश्चित झालेला असून भूखंड ताब्यात न आलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या चार गिरण्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक सदनिका भविष्यात उपलब्ध होतील. मात्र त्यांची नेमकी संख्या अद्याप गुलदस्त्यात आहे.