मनसेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना शांत करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन मागे घेतले आणि मग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही, ‘‘मी पुण्याला केवळ ‘वैशाली’मधील डोसा खाण्यासाठी जाणार होतो. बाकी माझे काहीच काम नव्हते,’’ असे सांगत आपलेही आव्हान मागे घेतले. त्यांनी आव्हान दिले म्हणून आपणही आव्हान दिले. आता त्यांनी आव्हान मागे घेतले तर आपणही आव्हान मागे घेत आहोत, असे त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  
कोणालाही कुठेही मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगत शरद पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत आंदोलन करू नका, असा सल्ला दिला. त्यावर राज ठाकरे यांनीही उपहासात्मक पद्धतीने उत्तर देत आपणही आव्हान मागे घेत असल्याचे सांगितले.
साताऱ्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना मनसेचा चोप
वाई : सातारा सनिक शाळेमध्ये वयाच्या बनावट दाखल्याच्या आधारावर प्रवेश मिळवणाऱ्या परप्रांतीय मुलांच्या पालकांना सोमवारी मनसेने चोप दिला. शासकीय रुग्णालयात मनसेने काढलेल्या मोर्चानंतर या परप्रांतीय पालकांनी येथून काढता पाय घेतला. सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी वयाचा दाखला द्यावा लागतो. परप्रांतीय मुले वयाने मोठी असूनही त्यांच्याकडे कमी वयाचे दाखले असल्याचे आढळल्याने मनसेने या प्रवेश प्रक्रियेविरुद्ध आंदोलन करत संबंधित परप्रांतीय मुलांच्या पालकांना पिटाळून लावले. मनसे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी, परप्रांतीय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करताना त्यांची शारीरिक रचना व वयाच्या दाखल्याची पडताळणी केली जावी, अशी मागणी केली.